रत्नागिरी, दि.6 (जिमाका) :- पोलीस विभागाच्या प्रस्तावित प्रकल्पामध्ये पोलीस दलाची ऐतिहासिक वाटचाल सांगणारे संग्रहालय करा, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधितांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री श्री सामंत यांनी थ्रीडी मॅपिंग मल्टीमीडिया, रत्नागिरी नगरपरिषद अंतर्गत विविध विकास कामे, पोलीस विभागाचा प्रस्तावित बांधकाम प्रकल्प, मंडणगड दिवाणी न्यायालय उद्घाटन व भूमिपुजन तसेच जिल्हा सत्र न्यायालयातील रविंद्रनाथ टागोर यांच्या धातूशिल्पाचे अनावरण आणि जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विविध समित्यांचा आढावा आज घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चद्रकांत सूर्यवंशी, सर्वसाधारण उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रांताधिकारी जीवन देसाई मुख्याधिकारी तुषार बाबर व संबंधित अधिकारी आदी उपस्थित हाते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, थ्रीडी मॅपिंग मल्टीमीडियाचे लोकार्पण 26 जानेवारीला होईल, अशा पध्दतीने कामकाज करावे. संरक्षण भिंत रंगरंगोटी, साफसफाई सुशोभिकरणासाठी १ कोटीचा निधी दिला जाईल. पावसामध्ये टिकणारे फर्निचर कायमस्वरुपी करावे. पर्यटन वाढीच्या दृष्टीकोनातून भव्य कामकाज झाले पाहिजे. रत्नागिरी नगर परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या नाट्यगृहाचे लोकार्पण 26 जानेवारीला होईल, त्यादृष्टीने गतीने कामकाज करावे. ध्यान केंद्र, बुध्दांची गोल्डन मूर्ती याबाबत विशेष लक्ष द्यावे. सर्वसामान्यांना अत्यल्प खर्चात लग्नकार्य करता यावे, यासाठी मंगल कार्यालय उभारण्यासाठी 1 कोटीचा निधी दिला जाईल. त्याचबरोबर वक्फ बोर्डाच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनुसार त्यांच्यासाठी उभारण्यात येणाऱ्या मंगल कार्यालयासाठी 1 कोटी दिले जातील.
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नुतन प्रस्तावित इमारतीमध्ये संग्रहालयाची निर्मिती करण्यात यावी. यामध्ये पोलीस दलाचा इतिहास बदलत जाणारे त्यांचे पोशाख, ऐतिहासिक शस्त्रे यांची माहिती आणि वस्तू असाव्यात. हे संग्रहालय राज्यातील अनोखे व्हावे, यासाठी प्रयत्न करावेत.








