पोलादपूर (शैलेश पालकर): तालुक्याच्या ग्रामीण भागातील देवीभक्तांना नवरात्रौत्सव काळात देवींच्या दर्शनाची पर्वणीच लाभली असल्याचे दिसून येत आहे. सायंकाळी ग्रामदेवतांच्या मंदिरात असंख्य स्त्री-पुरूष भाविक आराध्य देवतेस हात जोडण्यासाठी जात असल्याचे गावोगाव दृश्य दिसून येत आहे.
पोलादपूर तालुक्यातील वाकणची कांळकाईदेवीचे उंच टेकडीवरील मंदिर जागृत असल्याची वदंता आहे. या वाकणच्या काळकाईदेवीचे मूळस्थान मंदिरासमोरील धामणेचीवाडीतील तारणटेप टेकडीवरच्या एका गढीमध्ये असल्याची माहितीही ग्रामस्थांकडून प्राप्त झाली आहे. रहाटातील काळकाईदेवीचे स्थान शिवकालीन असल्याचे मानले जाते. तीन जागृत काळकाई असलेल्या संपूर्ण वाकण गावांत देवीचे भक्त असल्याने वाकण गावातील ग्रामस्थांत काळकाईदेवीची भक्ती मोठया प्रमाणात दिसून येते. तालुक्यात या गावावरून वाकणची काळकाई हा देवीचा उल्लेख सर्वत्र होत असतो. मात्र, तालुक्यातील रानबाजिरे आदिवासीवाडी, पार्ले आदिवासीवाडी, पोलादपूरसह अनेक गावांमध्ये काळकाईचे भक्त भाविक मोठया संख्येने दिसून येतात. कोतवाल बुद्रुक येथे काळकाई, जननीआई व कुंभळजादेवी या ग्रामदैवता आहेत.
पोलादपूर तालुक्यातील कापडे येथे वरदायिनीदेवी आणि काटेतळीमध्ये रामवरदायिनीदेवी भाविकांमध्ये प्रसिध्द आहेत. यापैकी कापडे येथील वरदायिनीदेवीचे पाषाण पुरातन व मुकूट हेमाडपंथी शैलीतील दिसून येतो; जो सातारा जिल्ह्यातील पार येथील श्रीरामवरदायिनीदेवीच्या मंदिरातील काचेच्या कपाटातील अष्टभुजा तुळजाभवानीच्या मुकुटाप्रमाणे आहे. काटेतळी येथील श्रीरामवरदायिनीदेवीचे स्थान जागृत मानले जाते.
कुडपण येथील भराडी, भुतरान आणि आवेरी या तीन नद्यांच्या उगमस्थानाजवळच जगबुडी नदीमध्ये संगम झाला आहे. तेथे औदूंबराचा एक निष्पर्ण वृक्ष आश्चर्यकारकरित्या जीवंत स्थितीत आहे आणि तो या त्रिवेणी संगमावर दीडशे वर्षांपासून पानांविनाच वाढत आहे. याठिकाणी असलेल्या स्वयंभू भराडीदेवीच्या मंदिरामध्ये काळकाईदेवीदेखील आहे. अतिशय प्राचीन असे हे देवस्थान असून आजही त्याच स्थितीत आहे. या मंदिरात एक विशाल पुरातन सांबरशिंग मंदिरात प्रवेश केल्यानंतर दिसून येते. अलिकडेच, एका भाविकाने भराडीमातेला सोन्याचा मुकूट अर्पण करून नवसपूर्ती केली आहे. यावरून या भराडीमातेची प्रचिती भाविकांना आजही येत असल्याची तालुक्यात चर्चा आहे.अलिकडेच या कुडपण गावात वातारकांब नावाची एक गुहा आढळून आली आहे. कोतवाल बुद्रुक येथील जननी कुंभळजय आणि कालिकामातांचे मंदिर जिर्णोध्दारानंतर आकर्षण ठरत आहे. देवपूर येथील कोंडजाई देवीचे जागृतस्थान चर्चेत आहे. पोलादपूर तालुक्यातील पायटे गावातही भराडीमातेचे मंदिर आहे. पोलादपूरलगतच्या उत्तरवाहिनी सावित्रीनदीकिनारी चरई येथील कालिकामातेचे मंदिर नवसाला पावणारी असल्याचे अनुभव राजकीय व्यक्तींना आल्याने तेथे नवसपूर्तीचे जाहिर कार्यक्रम झाले. या कालिकामातेच्या जागृत देवस्थानाची चरईसह नदीपल्याड अनेकांना अनुभूती आहे.
पोलादपूर शहरातील ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ जोगेश्वरी मंदिराबाहेर श्रीकाळकाईदेवीचे छोटे मंदिर आहे. मंदिरामध्ये मरीआई आणि जोगेश्वरीमातेचे पाषाण आहेत तर मंदिरामागे टेकडीच्या खाली एक विशाल वटवृक्षाखाली जाकमातेचे स्थान आहे. सावित्री नदीकिनारी गंगामातादेवीचे मंदिर आहे. गेल्या 17 वर्षांपूर्वी कै.प्रभाकर शेठ यांनी दैवी दृष्टांतानुसार बांधलेल्या श्रीसद्गुरू मंदिरामध्ये श्रीमहादूर्गा, महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी, महाअन्नपूर्णा आणि श्रीमंगलादेवीच्या प्रसन्नमर्ूत्यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या मंदिरातील सर्व मूर्ती रेखीव प्रसन्नमुद्रेत असल्याने भाविकांना तल्लीन होऊन दर्शनाचा लाभ घेता येतो. या मंदिरात अष्टभुजा महिषासुरमर्दिनीची उग्रमूर्तीही चित्ताकर्षक आहे.








