रत्नागिरी, दि. २८ : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये रविवारी लसीकरण मोहीम उत्साहात पार पडली. प्रभागातील ९३ बालकांची नोंद असून सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष नियोजन करण्यात आले.
मोहिमेची पाहणी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका वर्षा ढेकणे, पदाधिकारी विक्रम जैन आणि सुरेंद्र लांजेकर यांनी लसीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी, परिचारिका आणि आशा सेविकांच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पालकांना आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्याचे आवाहन केले. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी प्रत्येक पालकाने जबाबदारीने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. तसेच पोलिओमुक्त भारताचे स्वप्न कायम राखण्यासाठी शासनाच्या या महत्त्वपूर्ण मोहिमेत प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.
आरोग्य विभागाच्या अधिकारी, परिचारिका आणि आशा सेविकांनी नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविली. प्रभाग क्रमांक १५ मधील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत बालकांच्या आरोग्याबाबत जागरूकता दाखविल्याचे समाधान यावेळी व्यक्त करण्यात आले.








