चिपळूण पूरस्थिती : व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशांत यादवांचे आश्वासन

चिपळूण, दि. २० (प्रतिनिधी): गेल्या तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण शहरात वाशिष्टी नदीला आलेल्या पुराचे पाणी बाजारपेठेत घुसले. यामुळे लहानमोठ्या अनेक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले उद्योजक आणि वाशिष्टी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी बुधवारी चिपळूण व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन नुकसानीचा आढावा घेतला.
यादरम्यान व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी अनेक मागण्या मांडल्या. विशेषतः चिपळूणच्या रेड व ब्ल्यू पूर रेषेच्या फेरसर्वेक्षणाबाबत पहिल्या कंपनीकडून सर्वेक्षण होऊ न देता अन्य सक्षम कंपनीकडून हे काम करून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय वाशिष्टी नदीच्या पात्रात साचलेला गाळ आणि पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरणारी लहान लहान बेटे काढून टाकण्याबाबतही व्यापाऱ्यांनी लक्ष वेधले.
प्रशांत यादव यांनी व्यापाऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. रेड व ब्ल्यू पूर रेषेसंदर्भातील फेरसर्वेक्षण योग्य पद्धतीने होईल यासाठी प्रयत्न करेन आणि पहिल्या कंपनीला हे काम मिळू नये यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, अशी ग्वाही त्यांनी व्यापाऱ्यांना दिली.
चिपळूण बाजारपेठेत पुरामुळे झालेल्या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावाही यादव यांनी व्यापाऱ्यांसोबत घेतला. या बैठकीला व्यापारी संघटनेचे शिरीष काटकर, अरुण भोजने, अशरफ मेमन, फैसल पिलपिले, कुंदन खातू आणि महेश महाडिक हे पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी वाचा