जंतर-मंतरवरील आंदोलन चिघळले; सोनम वांगचुक यांना हटवून रुग्णालयात दाखल, विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली, दि. १८ : नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरव्यवहार, परीक्षा व्यवस्थेतील अनियमितता आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या २१ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले पर्यावरणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शनिवारी पहाटे दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून हटवून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. या कारवाईनंतर जंतर-मंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आंदोलकांनी सरकारवर आंदोलन दडपण्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी ही कारवाई दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार केल्याचे स्पष्ट केले आहे.

सोनम वांगचुक गेल्या तीन आठवड्यांपासून नीट परीक्षेतील कथित घोटाळा, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषण करत होते. शनिवारी पहाटे मोठ्या संख्येने साध्या वेशातील पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाले. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला ते वैद्यकीय पथक असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सोनम वांगचुक यांच्याभोवती चादरीचा आडोसा करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत सफदरजंग रुग्णालयात हलविले. या कारवाईदरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली, तर अनेक आंदोलनकर्त्यांना आंदोलनस्थळावरून हटविण्यात आले.

दिल्ली पोलिसांचे उपायुक्त (डीसीपी) सचिन शर्मा यांनी सांगितले की, दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन, सोनम वांगचुक यांची खालावलेली प्रकृती आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आंदोलकांना शांततेच्या मार्गाने जंतर-मंतर परिसर रिकामा करण्याचे आवाहनही केले. सफदरजंग रुग्णालय प्रशासनाने वांगचुक यांना आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आल्याची माहिती देत, दीर्घकाळ उपोषणामुळे त्यांना अशक्तपणा आणि निर्जलीकरणाचा त्रास झाला असला तरी ते शुद्धीवर असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.

या घटनेनंतर सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत, “माझी, कुटुंबीयांची आणि गेल्या २० दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणाऱ्या डॉक्टरांची संमती घेतल्याशिवाय त्यांना कोणतेही औषध किंवा उपचार देऊ नयेत,” अशी मागणी केली.

दरम्यान, आंदोलनात सहभागी असलेले कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजित दीपके यांनी दिल्ली पोलिसांनी आपल्याला मारहाण करून ताब्यात घेतल्याचा आरोप केला. त्यांनी पुढे आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली. याच दरम्यान आंदोलनस्थळी एका महिलेनं अभिजित दीपके यांच्या अंगावर शाई फेकल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी संबंधित महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

या कारवाईनंतर देशभरातून राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना, “खोटेपणा आणि हिंसाचार ही मोदी सरकारची मूलभूत तत्त्वे झाली आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या व्यक्तीचा आवाज दडपणे चुकीचे आहे,” असे म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनम वांगचुक यांच्या मागण्या योग्य असल्याचे सांगत सरकारने संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्याची टीका केली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर निशाणा साधत, “सरकारला जर वांगचुक यांच्या प्रकृतीची काळजी होती, तर त्यांच्याशी आधीच चर्चा करून तोडगा काढायला हवा होता. धर्मेंद्र प्रधान यांच्या चुका असूनही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही,” असा सवाल उपस्थित केला.

काँग्रेसचे नेते सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे रोहित पवार, जितेंद्र आव्हाड तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही या कारवाईवर जोरदार टीका करत केंद्र सरकारवर लोकशाही दडपल्याचा आरोप केला. “लोकशाही संपली, हुकूमशाही सुरू झाली आहे,” असा आरोप विरोधकांनी केला.

दरम्यान, चित्रपट निर्माती किरण राव यांनीही सोशल मीडियावर सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शविला. त्यांनी सरकारने आंदोलकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, असे आवाहन केले.

पोलिसांनी ही कारवाई केवळ वैद्यकीय कारणास्तव आणि न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी करण्यात आल्याचे स्पष्ट केले असले, तरी आंदोलनकर्त्यांनी आणि विरोधी पक्षांनी ती आंदोलन दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप कायम ठेवला आहे. सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला असून, नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आगामी संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही गाजण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा