हातखंबा येथे दोन ट्रकची समोरा-समोर जोरदार धडक ; एक जागीच ठार, तिघे जखमी

रत्नागिरी, दि. १८ (प्रतिनिधी): मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे बुधवारी (दिनांक १८ ऑक्टोबर २०२३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. हातखंबा ब्रीज येथे आयशर व बारा चाकी ट्रकमध्ये समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात एक जागीच ठार झाला असून तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच तातडीने हातखंबा वाहतूक केंद्राचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. हातखंबा पोलीस पाटील सनगरे मॅडम ही दाखल झाल्या. कोल्हापूरहुन लाद्यांनी भरलेला आयशर (गाडी क्रमांक MH ०९ EM ८६९८) हा (चालक नाव माहिती नाही) हातखंबा दिशेने येत होता. तर (गाडी क्रमांक MH ०९ FL ९१५३) हा पालीच्या दिशेने जात होता. दोन्ही वाहने हातखंबा येथे आली असता जोरदार धडक बसली. आयशर गाडीच्या मागे हौद्यात राजन बाबल्या डांगे (वय ४०, राहणार हातखंबा, डांगेवाडी) हा बसला होता. अपघात झाल्यावर आयशर लाद्यासहित पलटी झाला. यातच डांगे हा दबला गेला. व त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान घटनास्थळी क्रेनही दाखल झाली. आयशरमधील चालक केबिनमध्ये अडकला होता. अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यास शर्तीचे प्रयत्न सुरू होतें. मात्र क्रेनच्या सहाय्याने आयशर गाडी बाजूला करून चालकाला बाहेर काढण्यात आले. तसेच बारा चाकी गाडीतील जखमी चालकाला व आयशरमधील बसलेल्या एकाला असे तिघांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर मुंबई गोवा महामार्गावरील दोन्हीं बाजूस लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. अपघातग्रस्त दोन्हीं वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला करून वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत सुरू केली.


सायंकाळी साडेसात वाजता अपघाताचा मोठा आवाज आला. हा आवाज ऐकुन स्थानिक नागरिक व हातखंबा परिसरातील नागरिकांनी अपघात पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. अपघात एवढा भयंकर होता की, बघणाऱ्यांच्या अंगावर अक्षरश: काटा उभा राहिला. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

आणखी वाचा