जिद्द, संघर्ष आणि मातृत्वाचा गौरव : आस्थाचा ‘सुपर मॉम’ पुरस्कार सौ. ज्योत्स्ना कुळये यांना

रत्नागिरी, दि. ८ : दिव्यांगांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या आस्था सोशल फाउंडेशन, रत्नागिरीतर्फे दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दिला जाणारा ‘सुपर मॉम’ पुरस्कार यंदा सौ. ज्योत्स्ना अजित कुळये यांना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पाच हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सौ. ज्योत्स्ना कुळये या गुहागर तालुक्यातील उमराड गावच्या माहेरवाशीण असून लांजा तालुक्यातील गोविळ येथील सासरवाशीण आहेत. विवाहानंतर त्या उदरनिर्वाहासाठी मुंबईत राहत होत्या. २००७ साली त्यांच्या मोठ्या मुलगा देवेशचा जन्म झाला. मात्र जन्मानंतर डॉक्टरांनी देवेशला मणक्याचा गंभीर आजार असल्याचे सांगितले. पुढील काळात देवेशवर एक-दोन नव्हे तर तब्बल १४ लहान-मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तरीही तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकला नाही.

या कठीण परिस्थितीतही ज्योत्स्ना ताईंनी खचून न जाता सासरच्या मंडळींच्या आधाराने परिस्थितीशी जिद्दीने सामना केला. सुरुवातीला देवेशला विशेष शाळेत दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची बुद्धिमत्ता चांगली असल्याचे लक्षात येताच ज्योत्स्ना ताईंनी त्याला सामान्य शाळेत प्रवेश मिळवून दिला. दररोज त्याला उचलून शाळेत नेणे, व्हीलचेअरवर बसवणे आणि शाळा सुटल्यावर पुन्हा घरी आणणे असा त्यांचा दिवसाचा संघर्ष सुरू असायचा.

दिवसभर शाळेत थांबत असल्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापिकांनी त्यांना बालवर्गाला शिकवण्याची संधी दिली. केवळ दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या ज्योत्स्ना ताईंनी ती संधीही समर्थपणे निभावत आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली.

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात त्या मुलगा देवेशला घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील बेणी गावात आल्या. येथे धनावडे नर्सरीमध्ये त्यांचे पती अजित महादेव कुळये काम करत होते. लॉकडाऊननंतरही त्यांनी कायमस्वरूपी इथेच राहण्याचा निर्णय घेतला आणि देवेशला न्यू इंग्लिश स्कूल, लांजा येथे प्रवेश दिला. रोज रिक्षाने शाळेत ने-आण करत सुरू असलेल्या या संघर्षाचे फळ मिळाले आणि देवेशने दहावीच्या परीक्षेत ७४ टक्के गुण मिळवत यश संपादन केले.

देवेशला ऐकण्याचाही त्रास असल्याने पुढील शिक्षणासाठी त्याने तु. पु. शेटये कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी व बारावी कॉमर्स शाखेत प्रवेश घेतला. मायलेकाच्या या जिद्दीची दखल घेत त्याला ‘उडान दिव्यांग शिष्यवृत्ती’ही मिळाली. यावर्षी देवेशने बारावीची परीक्षा दिली आहे.

अत्यंत कठीण परिस्थितीत ८५ टक्के बहुदिव्यांग मुलाला जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर सक्षम व स्वावलंबी नागरिक म्हणून घडविण्यासाठी घेतलेल्या कष्टांचा गौरव म्हणून आस्था सोशल फाउंडेशनतर्फे सौ. ज्योत्स्ना कुळये यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन ‘सुपर मॉम’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विशेष म्हणजे त्यांच्या सासूबाई श्रीमती मंदाकिनी महादेव कुळये यांचा त्यांना सतत खंबीर पाठिंबा लाभत आहे. या प्रसंगी आस्था सोशल फाउंडेशनच्या सचिव श्रीम. सुरेखा पाथरे, श्री. संकेत चाळके, हसना नेवरेकर आणि आल्हाद पाथरे उपस्थित होते.

आणखी वाचा