जागतिक ऑटीझम जागरूकता दिनानिमित्त ‘आस्था’कडून जनजागृती उपक्रम

रत्नागिरी, दि. २ (प्रतिनिधी) : २ एप्रिल हा दिवस ‘जागतिक स्वमग्नता (ऑटीझम) जागरूकता दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर आस्था सोशल फाउंडेशन, रत्नागिरी यांच्या वतीने रत्नागिरी बस स्थानक येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमांतर्गत ऑटीझम म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती आणि त्याबाबत पालकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत सर्वसामान्य नागरिकांना सोप्या भाषेत माहिती देण्यात आली. तसेच चित्रांच्या माध्यमातून तयार केलेली माहितीपर पोस्टर्स बस स्थानक परिसरात लावण्यात आली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन कुमार आल्हाद सुरेखा पाथरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आस्था संस्थेच्या सचिव सुरेखा पाथरे यांनी ऑटीझमची लक्षणे आणि त्यावरील उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, मुलांमध्ये वयानुसार बोलण्यात उशीर होणे, अतिचंचलपणा, स्वतःमध्येच रमणे किंवा इतर मुलांमध्ये मिसळण्यास टाळाटाळ करणे अशी लक्षणे दिसल्यास पालकांनी तात्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. लवकर निदान होऊन योग्य वेळी थेरपी उपचार सुरू केल्यास अशा मुलांचा विकास योग्य पद्धतीने होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

आस्था संस्थेमध्ये अशा बालकांसाठी समुपदेशन, विविध थेरपी उपचार तसेच मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय जिल्हा शासकीय रुग्णालयातील डीईआयसी (District Early Intervention Centre) येथेही मुलांसाठी विविध सेवा उपलब्ध आहेत, असे नमूद करण्यात आले.

या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या श्रीम. विजेता मोर्ये यांनी सहभाग घेतला. तसेच आस्था संस्थेचे हेल्पलाईन जिल्हा समन्वयक संकेत चाळके, थेरपी सेंटर प्रमुख श्रीम. संपदा कांबळे, कार्यकर्ते, पालक आणि मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान ऑटीझमविषयी माहितीपत्रके वाटप करण्यात आले. ऑटीझम असलेल्या मुलांना समाजाने समजून घेऊन त्यांना प्रेम, आधार आणि स्वीकार देणे गरजेचे असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

आणखी वाचा