मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलच्या क्रिकेट स्पर्धेचे नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी, दि. २३ : माजी विद्यार्थी संघ, मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल रत्नागिरी आयोजित तालुकास्तरीय नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच मराठा मंदिर संस्थेचे आद्य संस्थापक कै. बाबासाहेब गावडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते फित कापून व श्रीफळ अर्पण करून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

या उद्घाटन समारंभाला प्रभाग क्रमांक ५च्या नगरसेविका तथा महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती सौ. पूजा दीपक पवार तसेच प्रसिद्ध उद्योजक श्री. अथर्व गजेंद्रशेठ पाथरे प्रमुख उपस्थित होते.

प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अंजली पिलणकर यांनी उपस्थित मान्यवर, पंच, गुणलेखक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थ्यांचे शोभेची रोपे देऊन स्वागत केले.

कार्यक्रमाला सेवानिवृत्त शिक्षक श्री. विनोद गावखडकर यांच्यासह माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी श्री. रणजीत सुवारे, श्री. अच्युत गजभिये, श्री. सुदेश निवळकर, श्री. आकाश परीट, श्री. योगेश कोरगावकर, श्री. प्रणित मेस्त्री, श्री. मंदार आचरेकर आणि श्री. प्रणव राऊळ यांची उपस्थिती लाभली. शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

स्पर्धेचे उपांत्य आणि अंतिम सामने रविवार, २४ मे रोजी सायंकाळी ७ ते ११ या वेळेत होणार असून त्याचवेळी बक्षीस वितरण समारंभही पार पडणार आहे. या स्पर्धेमुळे माजी विद्यार्थ्यांना एकत्र येण्याची आणि क्रीडामाध्यमातून आपुलकीचे बंध अधिक दृढ करण्याची संधी मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

आणखी वाचा