रत्नागिरी शहरात स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या विक्रीसाठी आणलेले अंबरग्रीस — म्हणजेच व्हेल माशाची उलटी — जप्त करत एक मोठी कारवाई केली आहे. तब्बल अडीच किलो वजनाच्या अंबरग्रीसची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे दोन कोटी पन्नास लाख रुपये असून, या प्रकरणी एजाज अहमद युसूफ मिरकर (वय ४१, रा. रत्नागिरी) या इसमाला अटक करण्यात आली आहे.
गोपनीय माहितीवरून सापळा
१ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, एमआयडीसी परिसरात एक व्यक्ती बेकायदेशीरपणे अंबरग्रीस विक्रीसाठी घेऊन येणार आहे. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. रात्री १०.४५ वाजता या पथकाने एमआयडीसी रत्नागिरी येथे सापळा रचून कारवाई केली.
आरोपीकडून मुद्देमालासह अटक
कारवाई दरम्यान एजाज मिरकर हा संशयित विनापरवाना अंबरग्रीस विक्रीच्या उद्देशाने ते बाळगत असताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन २.५ किलो अंबरग्रीस आणि सुमारे ५० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल असा एकूण २.५५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबरग्रीस हे भारतात संरक्षणाधीन आणि व्यापारबंदी असलेल्या सागरी जीवांपैकी स्पर्म व्हेल या माशाच्या शरीरातील पदार्थांपैकी एक मानले जाते. त्यामुळे त्याचा व्यापार कठोरपणे बेकायदेशीर आहे.
पोलिसांची कौतुकास्पद धडाकेबाज कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, तसेच पोलीस अंमलदार विजय आंबेकर, दिपराज पाटील, विवेक रसाळ, गणेश सावंत, अतुल कांबळे आदींचा मोलाचा सहभाग होता.
अंबरग्रीस म्हणजे काय?
अंबरग्रीस — किंवा “व्हेल माशाची उलटी” — ही एक अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान जैविक वस्तू असून, ती स्पर्म व्हेल माशांच्या पचनसंस्थेतून उत्सर्जित होते. अनेकदा सागरात तरंगताना किंवा समुद्रकिनाऱ्यावर सापडते. सुगंधी पदार्थ तयार करणाऱ्या उद्योगांमध्ये याचा वापर ‘फिक्सेटिव्ह’ म्हणून होतो. अंबरग्रीसची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत एक कोटी रुपये किलोपेक्षा जास्त असते. भारतात मात्र याचा व्यापार बेकायदेशीर आहे.
पुढील तपास सुरू
सध्या आरोपीचा आणखी कोणी संपर्कात होता का? त्यामागे कोणते रॅकेट आहे का? हे शोधण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. तपास अधिक खोलात जाऊन केल्यास आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.