रत्नागिरी, दि. २२ (प्रतिनिधी): रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये काल चुरशीने मतदान झाले. रत्नागिरीत सरासरी ६३ टक्के मतदान झाले असून आता जिंकणार कोण या प्रश्नावर प्रत्येक जण नाक्यानाक्यावर चर्चा करत आहे. हवा काय आहे, वातावरण कसं आहे, कोण येणार, परिवर्तन होणार की विद्यमान मंत्र्यांना पुन्हा संधी मिळणार अशा अनेक प्रश्नांवर चर्चा रंगू लागली आहे. काही जणांनी कोण जिंकणार यावरही पैजा लागल्या आहेत. गेल्या २०१९ च्या निवडणुकीपेक्षा थोडेसे जास्त टक्के मतदान झाल्यामुळे वाढलेला टक्का कोणाला तारणार यावरही चर्चा ऐकायला मिळत आहेत.
उदय सामंत हे शिवसेना- महायुतीकडून आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना- महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांच्यात सरळ लढत होती. यापूर्वी तीन वेळा त्यांच्यात वेगवेगळ्या पक्षात असताना लढत झाली व सामंत यांनी बाजी मारली. परंतु या वेळी बाळ माने भाजप सोडून शिवसेनेत गेल्यामुळे ही निवडणूक नेहमीपेक्षा लक्षवेधी ठरली.
भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची समाजमाध्यमातून व्हायरल झालेली प्रतिक्रिया, भाजपला विश्वासात न घेतल्याची सामान्य कार्यकर्त्यांची नाराजी यामुळे सामंत यांना मतदान किती होईल याबाबत मतदानाच्या दिवशीपर्यंत संभ्रमावस्था होती, असे मत कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत होते. त्यामुळे तुमचे मत कोणाला या प्रश्नावर अनेक मतदारांनी नो कॉमेंट्स अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यामुळे लोकांचा कल कुठे आहे याचा नेमका अंदाज बांधणे कठीण झाले आहे. सत्ताविरोधी वातावरणाचा फटका सामंत यांना बसू शकतो, अशी प्रतिक्रिया काही जणांना व्यक्त केली.
अल्पसंख्यांक मतदारांचा टक्का कुठे याबाबतही मतमतांतरे व्यक्त झाली. भाजपच्या काही बूथकमिट्या महायुतीमधील शिंदे गटाने आपल्याकडे घेतल्याबाबतही नाराजी व्यक्त झाली.