रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, खेर्डी शाखेचा माहिती मेळावा उत्साहात पार पडला

खेर्डी (ता. चिपळूण), दि. ०१ (अनिल फाळके):  रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, रत्नागिरी – खेर्डी शाखेच्यावतीने खेर्डी ग्रामपंचायत येथील श्रीकृष्ण सभागृहात विविध कर्ज योजना व केंद्र शासनाच्या योजनांविषयी माहिती देण्यासाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी शाखा व्यवस्थापक सौ. प्रिया खानविलकर यांनी बँकेच्या विविध योजनांची सविस्तर माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली. बँकेच्या माध्यमातून शेतकरी, मच्छिमार, स्वयंरोजगार करणारे युवक, गृहिणी, विद्यार्थी आणि इतर घटकांसाठी लाभदायक अशा योजनांची माहिती देण्यात आली. शेती व पूरक व्यवसाय, घरकुल कर्ज, शिक्षण कर्ज, पर्यटन विकास, मच्छिमार कर्ज, दुचाकी-चारचाकी खरेदी, पगार तारण, वैयक्तिक कर्ज, गणपती मूर्तीकारांसाठी खास योजना, विहीर बांधणी, डेअरी युनिट, कुक्कुटपालन व्यवसाय, किसान क्रेडिट कार्ड व एग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड अंतर्गत योजना यांचा समावेश होता.
सौ. खानविलकर यांनी यावेळी सांगितले की, बँकेच्या योजनांचा लाभ अधिकाधिक ग्रामस्थांनी घ्यावा यासाठी खेर्डीसह आजूबाजूच्या गावांमध्ये व वाड्यांवर जाऊन थेट जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात आर्थिक साक्षरता आणि योजनांबाबत जागरूकता वाढवण्याचा बँकेचा प्रयत्न राहणार आहे.
या कार्यक्रमास खेर्डी ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभले. ग्रामपंचायतीचे कर्मचारी, स्थानिक नागरिक, महिला मंडळ, युवा वर्ग यांचा मोठा सहभाग होता. ग्रामस्थ अनिल फाळके यांची देखील उपस्थिती लाभली. सभागृहात उपस्थित प्रत्येक नागरिकाने योजनांची माहिती गांभीर्याने ऐकली आणि आवश्यक त्या योजनांबाबत अधिक माहिती बँकेकडून घेतली.
या मेळाव्यात केंद्र शासनाच्या पुढील विमा व पेन्शन योजनांचीही माहिती देण्यात आली:
प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना (PMJJBY)
वयाची अट: 18 ते 50 वर्षे
वार्षिक हप्ता: ₹436
लाभ: अपघाती मृत्यूनंतर नामनिर्दिष्ट व्यक्तीस ₹2 लाख
अट: बँकेत बचत खाते असणे आवश्यक
प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY)
वयाची अट: 18 ते 70 वर्षे
वार्षिक हप्ता: ₹20
लाभ:
  • पूर्ण अपघाती मृत्यू – ₹2 लाख
  • अंशतः अपंगत्व – ₹1 लाख
    अट: बँकेत बचत खाते असणे आवश्यक
अटल पेन्शन योजना (APY)
वयाची अट: 18 ते 40 वर्षे
हप्ता: मासिक/त्रैमासिक/सहामाही
लाभ: निवृत्तीनंतर ₹1,000 ते ₹5,000 पर्यंत मासिक पेन्शन
प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY)
लाभ:
  • झीरो बॅलन्स खाते
  • मोफत रुपे कार्ड
  • ₹1 लाख अपघाती विमा
  • थेट लाभ हस्तांतरण
  • ₹10,000 पर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा (अटी लागू)
या सर्व योजना रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खेर्डी शाखेत उपलब्ध असून, अधिक माहितीसाठी शाखेशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन सौ. प्रिया खानविलकर यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे संयोजन सुस्थितीत पार पडले असून, ग्रामस्थांच्या मनात बँकेविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. हा उपक्रम खेर्डी व परिसरातील आर्थिक विकासासाठी निश्चितच मोलाचा ठरणार आहे.

आणखी वाचा