रत्नागिरी, दि. २९ : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेतून अपहार झालेल्या तब्बल ५० लाखांच्या (५०४.३४ ग्रॅम) सोन्याच्या दागिन्यांचा संपूर्ण मुद्देमाल शोधण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणात संशयित शिपाई अमोल आत्माराम मोहिते (४२, रा. टिके, रत्नागिरी) याने हे दागिने रत्नागिरीतील ४ ते ५ वेगवेगळ्या बँकांत तारण ठेवून तब्बल ३५ लाखांचे कर्ज घेतले. एका बँकेतून कर्ज काढून दुसऱ्या बँकेचे कर्ज फेडण्याची साखळी त्याने राबवली आणि अखेरीस संपूर्ण रक्कम उडवली.
दरम्यान, यापूर्वी पोलिसांनी संशयिताच्या घरी छापा टाकून २ तोळे सोने जप्त केले होते. मात्र उर्वरित सोने तारणातून सापडल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. शहर पोलिस विभागाने संबंधित बँकांना नोटीसाही बजावल्या आहेत.









