संगमेश्वर, दि. २९ : केंद्रप्रमुख श्री. दिलीप देवजी जाधव यांची बदली झाल्याने संगमेश्वर क्र. १ आणि क्र. २ केंद्राच्या वतीने त्यांच्या सन्मानार्थ सदिच्छा समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
या वेळी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा संगमेश्वर क्र. २ येथे आयोजित पहिल्या शिक्षण परिषदेत नवीन अभ्यासक्रम आणि पायाभूत जीवन कौशल्य विकास या विषयावर शिक्षक श्री. शिवप्रसाद गडमवार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. इयत्ता पहिलीच्या कवितांचे गायन विद्यार्थ्यांनी सादर केले.
या प्रसंगी केंद्रप्रमुख श्री. दिलीप जाधव यांची दापोली येथे बदली झाल्याने त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. १६ महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी संगमेश्वर केंद्रात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्राने विविध उपक्रमांत सातत्याने आघाडी घेतली. त्यांच्या सत्कारासाठी शाल, श्रीफळ व भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.
जाधव सरांनीही शिक्षकांना भेटवस्तू देत त्यांच्या सहकार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित शिक्षकांना मिठाईचे वाटप करण्यात आले. प्रशासकीय कामकाज आणि उपक्रमपूर्ण शिक्षण परिषदेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली.