संविधान दिन : अत्यंत उत्साहात शिस्तबद्धपणे संविधान रॅली संपन्न

गुहागर, दि. २८ ( प्रतिनिधी) : समता सैनिक दल आणि संविधान सन्मान समिती जिल्हा रत्नागिरी याच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी रत्नागिरी ते चिपळूण अशी १०० किमी ची रॅली काढण्यात आली होती. प्रा. डॉ. गुलाबराव राजे, मा. संतोष मोहिते यांच्या नेतृत्वात रॅली अभूतपूर्व उत्साहात पार पडली. सकाळी ८ वा रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्राचार्य डॉ. साखलकर यांच्या हस्ते रॅलीचे उदघाट्न झाले. ह्यावेळी NCC व NSS च्या 400 विध्यार्थांनी तसेच समता सैनिक दलाच्या 30 मार्शल्सनी बाबासाहेबांना आणि संविधानाला सलामी दिली. डॉ. गुलाबराव राजे यांनी संविधानातील अनुच्छेद १४ ते ३० नागरिकांचे हक्क आणि अनु. ५१ मधील कर्तव्ये ह्यावर मार्गदर्शन केले.
पुढे नवनिर्माण कॉलेज रत्नागिरी येथे १२०० विध्यार्थ्यानी  संविधान रथावर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. यावेळी संस्था अध्यक्ष मा. अभिजित हेगशेट्ये यांनी संविधानातील मूल्यांवर उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, व संविधान रॅलीतील नागरिकांना संबोधित केले. पुढे रॅली संगमेश्वर येथील नवनिर्माण  नर्सिंग कॉलेज व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आली. तिथे प्राचार्य डॉ. संजना चव्हाण, प्राध्यापक, 600 विध्यार्थी यानी संविधानातील स्लोगन्स दाखवून रॅलीचे स्वागत केले. उपस्थिताना मा. शाहिद खेरटकर यांनी संबोधित केल्यानंतर रॅली पोलीस ताफयासह पैसा फंड हायस्कुल संगमेश्वर येथे आली. तिथे संस्था चालक, प्राचार्य, शिक्षक, आणि 800 विध्यार्थी यांनी रॅलीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. प्रा. प्रथमेश तांबे यांनी उपस्थितांना संविधानावर संबोधित केले आणि दुपारी 2.30 वा रॅली सावर्डे येथे पोहोचल्यावर मा. आमदार शेखर निकम यांनी रॅलीचे कार्यकर्त्यासमवेत स्वागत केले.
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम हायस्कुल, ज्यु. कॉलेज व सिनियर कॉलेजच्या १५०० विध्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांनी पुष्पवृष्टी करून रॅलीचे स्वागत केले. यावेळी मा. शाहिद खेरटकर आणि प्राचार्य वारेसर यांनी उपस्थिताना संविधानावर संबोधित केले.
रॅली पुढे मा. बाळासाहेब माटे हायस्कुल, कामथे येथे आल्यानंतर ४०० विध्यार्थी, प्राचार्य, शिक्षक यांनी रॅलीचे स्वागत केले. यावेळी ऍड. स्मिता कदम यांनी उपस्थितीतांना संबोधित केले. सर्वच  शाळा व महाविद्यालयात कार्यक्रमादरम्यान विभाग प्रमुख, विशेष प्रविण्य मिळवलेले विध्यार्थी यांना संविधान प्रास्ताविका भेट देऊन गौरविण्यात आले.
सायं. ५ वा रॅलीचे आगमन चिपळूण मधील छ. शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्या जवळ आली. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी मा. राजमाने साहेब व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भोसले साहेब यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीचे स्वागत केले. समता सैनिक दलाच्या जवानानी सलामी दिली व रॅली सायं. 6 वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील सभा स्थळी पोहोचली. सभेमध्ये प्रा. डॉ. गुलाबराव राजे यांनी प्रास्ताविक करताना गेल्या ७५ वर्षात संविधानातील तरतुदी देशाच्या विकासासाठी कश्या उपयोगी ठरल्या याची मांडणी केली व कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रमुख वक्ते म्हणून संविधान प्रचारक मा. संदीप बर्वे यांनी संविधानाचे महत्व अधोरेखित करताना माणूसपण नाकारलेल्या व्यक्तींना सन्मानपूर्वक जीवन जगता येण्यासाठीची परिस्थिती संविधानाने कशी निर्माण केली हे विस्तृतपणे मांडले. त्यासोबतच संविधानाला असलेले धोके स्पष्ट करून अत्यंत जागृत राहून संविधान सन्मानाची चळवळ सर्वांना पुढे नेण्याची आवश्यकता विषद केली.
दुसऱ्या वक्त्या प्रा. निलम पंडीत यांनी संविधान निर्मितीतील महिलांचा सहभाग कसा आणि किती होता याची मांडणी करून संविधानातील बरकावे नागरिकांच्या दररोजच्या जगण्याचा भाग कसे आहेत ये स्पष्ट केले. मा. शाहिद खेरटकर यांनी अत्यंत खुमासदार आणि ओघवत्या शब्दशैलीत प्रभावी सूत्रसंचालन केले. मा. संतोष मोहीते यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

आणखी वाचा