सावर्डे, दि. २० : जिल्ह्यात अवैध शस्त्रांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस दलाने सुरू केलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (एलसीबी) मोठे यश मिळाले आहे. सावर्डे पोलीस ठाणे हद्दीतील आगवे (ता. चिपळूण) येथे एका इसमाला दोन बंदुका व जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एलसीबीचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पथक १८ मार्च २०२६ रोजी सावर्डे परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी आगवे येथील महेश जाधव हा इसम आपल्या घरामागे अवैध दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचला. घराच्या मागील बाजूस असलेल्या गुरांच्या गोठ्याजवळील लाकडी खोपटीत एक इसम बंदूक साफ करताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी तत्काळ धाड टाकून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने आपले नाव महेश महेंद्र जाधव (वय ३५, रा. आगवे बौद्धवाडी, ता. चिपळूण) असे सांगितले. त्याची झडती घेतली असता एक सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक, एक जुनी ठासणीची बंदूक आणि ९ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल आढळून आला. या सर्व साहित्याची किंमत सुमारे ७० हजार ९०० रुपये इतकी असून संबंधिताकडे कोणताही वैध परवाना नसल्याने पोलिसांनी पंचांसमक्ष जप्तीची कारवाई केली.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. २४/२०२६ नुसार भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३(१) व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सावर्डे पोलीस करत आहेत.
ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, पोलीस हवालदार विजय आंबेकर, दीपराज पाटील, विवेक रसाळ तसेच चालक पोलीस शिपाई अतुल कांबळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.








