दापोली, दि. १९ (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथील कृषि विस्तार शिक्षण विभागात कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या शिल्पा प्रदीपकुमार नाईक यांनी राजस्थानमधील महाराणा प्रताप कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठ, उदयपूर येथून कृषिविद्या विषयातील पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. “महाराष्ट्रातील कोकण विभागासाठी भात–चवळी पीक पद्धतीतील सेंद्रिय अन्नद्रव्य व्यवस्थापन” या विषयावरील त्यांच्या संशोधनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सेंद्रिय शेती, शाश्वत पीकपद्धती आणि कोकणातील कृषि विकासाच्या दृष्टीने त्यांचे संशोधन उपयुक्त ठरणार असल्याचे मानले जात आहे. या संशोधनासाठी राजस्थान कृषि महाविद्यालय, उदयपूर येथील कृषिविद्या विभागाचे प्राध्यापक डॉ. पी. सी. चापलोट यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. तर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील संशोधन संचालक डॉ. पी. एस. बोडके यांनी सहमार्गदर्शक म्हणून मोलाचे सहकार्य केले.
तसेच राजस्थान कृषि महाविद्यालयाच्या कृषिविद्या विभागाचे प्रमुख डॉ. जगदीश चौधरी यांचेही मार्गदर्शन लाभले. त्यांच्या संशोधनावर आधारित शोध निबंध आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झाल्याने त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे.
शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यात उल्लेखनीय योगदान
शिल्पा नाईक यांनी १९९४ साली कृषि महाविद्यालय, दापोली येथून बी.एस्सी. (कृषि) पदवी संपादन केली. त्यानंतर १९९६ पासून त्यांनी कृषि महाविद्यालयाच्या कृषिविद्या विभागात सेवा सुरू केली. विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण क्षेत्रात सातत्याने योगदान दिले.
सेवेत कार्यरत असतानाच त्यांनी २०१८ मध्ये कृषिविद्या विषयात एम.एस्सी. (कृषि) पदवी प्राप्त केली. कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणून काम करताना त्यांनी माळी प्रशिक्षण अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना अध्यापन केले. तसेच संशोधन प्रकल्पांसाठी प्रश्नावली तयार करणे, माहिती संकलन आणि सांख्यिकी विश्लेषण यामध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
महिला सक्षमीकरणासाठीही योगदान
कृषि विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील महिला आणि बचत गटांना फळप्रक्रिया, नाचणी प्रक्रिया, मसाला प्रक्रिया यांसारख्या विषयांवर प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक महिलांनी स्वयंरोजगाराचा मार्ग स्वीकारला आहे.
‘टाकाऊपासून टिकाऊ’ या संकल्पनेवर आधारित उपक्रम, रानभाज्यांवरील प्रदर्शन आणि पाककृती स्पर्धांच्या माध्यमातून त्यांनी महिलांमध्ये कौशल्य विकास आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य केले आहे.
विविध लेखन आणि पुरस्कारांनी गौरव
आतापर्यंत त्यांनी सात शोध निबंध, तीन तांत्रिक लेख आणि शेतकऱ्यांसाठी २४ माहितीपर लेख प्रकाशित केले आहेत. दूरचित्रवाणी कार्यक्रम, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या विविध कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
जिद्द आणि चिकाटीचा प्रेरणादायी प्रवास
वयाच्या पन्नाशीनंतरही शिक्षणाची ओढ कायम ठेवत, सेवेत राहून राजस्थानसारख्या दूरस्थ ठिकाणी जाऊन पीएच.डी. पदवी संपादन करण्याचा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. संशोधन, शिक्षण आणि समाजाभिमुख कार्य यांचा सुंदर संगम साधणाऱ्या शिल्पा नाईक यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.








