स्मृती मंधाना @10000 : अशी कामगिरी करणारी जगातील चौथी महिला क्रिकेटपटू

तिरुवनंतपुरम,दि. २९ : भारत आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघांमधील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय महिला संघाने 30 धावांनी विजय मिळवत मालिकेत पुनरागमन केले. मात्र या विजयाइतकीच महत्त्वाची ठरली भारताची स्टार सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाची ऐतिहासिक कामगिरी.

मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये भारतीय संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे न झाल्याने दबावात असलेल्या संघाला चौथ्या सामन्यात स्मृती मंधानाने आपल्या फलंदाजीने नवी ऊर्जा दिली. या सामन्यात तिने 80 धावांची शानदार खेळी साकारत केवळ सामन्याचा निकालच बदलला नाही, तर आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पाही गाठला.

या डावादरम्यान 27वी धाव घेताच स्मृती मंधानाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपांमध्ये मिळून 10,000 धावांचा टप्पा ओलांडला. यासह महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारी ती जगातील केवळ चौथी खेळाडू ठरली आहे. तसेच हा पराक्रम करणारी ती मिताली राजनंतरची दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. स्मृतीपूर्वी भारताची मिताली राज, न्यूझीलंडची सुझी बेट्स आणि इंग्लंडची माजी कर्णधार शार्लोट एडवर्ड्स यांनी 10,000 धावांचा टप्पा गाठला आहे.

स्मृती मंधानाला महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीवीर फलंदाजांपैकी एक मानले जाते. तिने आपल्या आक्रमक आणि तितक्याच संयमी फलंदाजीने तिन्ही स्वरूपांत सातत्याने धावा केल्या आहेत. आत्तापर्यंत तिने 117 एकदिवसीय सामने खेळून 48.38 च्या सरासरीने 5,322 धावा केल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिने 157 सामने खेळत 29.87 च्या सरासरीने 4,050 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. याशिवाय सात कसोटी सामन्यांमध्ये तिने 57.18 च्या सरासरीने 629 धावा केल्या आहेत.

सध्या स्मृती मंधाना टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिची सातत्यपूर्ण कामगिरी आणि मोठ्या सामन्यांतील प्रभावी फलंदाजी भारतीय महिला क्रिकेटसाठी प्रेरणादायी ठरत आहे. 10,000 धावांचा टप्पा गाठत स्मृती मंधानाने केवळ एक वैयक्तिक विक्रम प्रस्थापित केला नसून, भारतीय महिला क्रिकेटचा जागतिक स्तरावरचा दबदबा अधिक मजबूत केला आहे.

आणखी वाचा