रत्नागिरी, दि. १२ : डोकेदुखी, दृष्टी कमी होणे, चक्कर येणे, हार्मोनल बदल किंवा पाठदुखी यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. ही मेंदूतील गाठी अथवा न्यूरॉलॉजिकल विकारांची सुरुवातीची लक्षणे असू शकतात, असा इशारा ठाणे येथील सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे देण्यात आला आहे. अत्याधुनिक न्यूरो-नेव्हिगेशन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हॉस्पिटलने आतापर्यंत १०० हून अधिक ब्रेन ट्यूमरग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार करत त्यांना नवजीवन दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
रत्नागिरी नगर परिषद यांच्या सहकार्याने सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे न्यूरॉलॉजी आणि मणक्यांच्या आजारांवरील मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, १७ मे २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत आर. बी. शिर्के हायस्कूल, सन्मित्र नगर, रत्नागिरी येथे होणार आहे. अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिड-टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ अर्बानिया, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हॉस्पिटलचे संचालक व प्रख्यात न्यूरॉलॉजिस्ट डॉ. दीपक ऐवळे आणि न्यूरोसर्जन डॉ. अमित ऐवळे यांनी सांगितले की, डोकेदुखी, दृष्टी कमी होणे, फिट्स येणे, चक्कर येणे तसेच महिलांमधील हार्मोनल बदल यांसारखी लक्षणे मेंदूतील गाठीची असू शकतात. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सोलारिस हॉस्पिटलमध्ये मेंदूतील गाठी काढण्यासाठी अत्याधुनिक न्यूरो-नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हे तंत्रज्ञान मेंदूसाठी जीपीएसप्रमाणे कार्य करत असून रिअल-टाईम इमेजिंगच्या सहाय्याने शस्त्रक्रियेदरम्यान अचूक मार्गदर्शन करते. त्यामुळे मेंदूतील गाठ किंवा समस्या असलेल्या भागावर डॉक्टरांना अचूक लक्ष्य साधता येते. या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित, कमी गुंतागुंतीची आणि अधिक परिणामकारक ठरत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
डॉ. अमित ऐवळे यांनी सांगितले की, एंडोस्कोपिक एंडोनाझल पिट्यूटरी ट्यूमर एक्सिजन सर्जरीद्वारे नाकावाटे मेंदूतील गाठ काढण्याची प्रक्रिया केली जाते. ही मिनिमली इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रिया असून यामध्ये कवटी उघडण्याची गरज भासत नाही. त्यामुळे रुग्णांना कमी वेदना होतात आणि त्यांची प्रकृती लवकर सुधारते. या शस्त्रक्रियेसाठी न्यूरोसर्जन, नेत्ररोगतज्ज्ञ, ईएनटी तज्ज्ञ, एंडोक्रायनॉलॉजिस्ट तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ यांचा समन्वय आवश्यक असतो. सोलारिस हॉस्पिटलमध्ये हे सर्व तज्ज्ञ एकाच छताखाली उपलब्ध असल्याने उपचार प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.
मणक्यांच्या शस्त्रक्रियांसाठीही न्यूरो-नेव्हिगेशन तंत्रज्ञान प्रभावी ठरत आहे. स्पाईन फिक्सेशन शस्त्रक्रियेदरम्यान स्क्रू कोणत्या दिशेने आणि किती अचूकतेने बसवायचे याचे मार्गदर्शन या तंत्रज्ञानाद्वारे मिळते. त्यामुळे स्क्रू चुकीच्या जागी बसणे, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड गळती किंवा इतर गुंतागुंत कमी होण्यास मदत होते. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या सहा तासांत रुग्णांना हालचाल करता येत असल्याचेही डॉ. अमित ऐवळे यांनी सांगितले.
डॉ. दीपक ऐवळे यांनी सांगितले की, पिट्यूटरी अॅडेनोमा हा मेंदूतील तुलनेने सामान्य प्रकारचा ट्यूमर असून मेंदूतील एकूण गाठींपैकी सुमारे १० ते १५ टक्के गाठी या प्रकारातील असतात. भारतात दरवर्षी लाखो रुग्ण या आजाराने प्रभावित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. एंडोस्कोपिक एंडोनाझल सर्जरी ही या गाठी काढण्यासाठी अधिक प्रभावी आणि सुरक्षित पद्धत मानली जाते.
गेल्या अडीच वर्षांत सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने १०० हून अधिक ब्रेन ट्यूमरग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. नाशिक, नांदेड, धुळे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरीसह राज्यातील विविध भागांतून रुग्ण उपचारासाठी येथे येत असल्याचे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले.
या मोफत शिबिरात दीर्घकालीन डोकेदुखी, व्हर्टिगो, फिट्स, नैराश्य, चिंता, पाठदुखी, मानदुखी, न्यूरोपॅथी, मायस्थेनिया ग्रॅव्हिस, हालचाल व संतुलनाशी संबंधित विकार तसेच मेंदू व मणक्यांच्या गाठींचा त्रास असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सदर शिबिराचा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांनी केले आहे.
नोंदणीसाठी श्री. विवेक महाकाळ (८६५५६९६४९६) किंवा श्री. पुरुषोत्तम पवार (८४३३५२९४३५) यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी पुष्कला एस. यांच्याशी ८४३३५२९७६९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








