साखरपा, दि. २१ : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात दख्खन बस थांब्याजवळ गुरुवारी सकाळी एसटी बस आणि एर्टिका कार यांच्यात भीषण समोरासमोर धडक होऊन पाच जण जखमी झाले. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद भिकाजी शिंदे (वय ५०, रा. भडकंबा) हे आपल्या ताब्यातील एसटी बस (एमएच १४ बीटी २७५३) खडीकोळवण ते साखरपा मार्गावर घेऊन जात होते. सकाळी सुमारे ९.४० वाजण्याच्या सुमारास बस आंबा घाटातील दख्खन बस थांब्याजवळ पोहोचली असता समोरून येणारी एर्टिका कार (एमएच ११ डीझेड ०३२९) आणि एसटी बस यांच्यात जोरदार धडक झाली.
एर्टिका चालक संतोष शिवाजी पवार (वय ५०, रा. रामनगर, सातारा) हे रत्नागिरीहून साताऱ्याकडे जात होते. या भीषण अपघातात एसटी चालक प्रल्हाद शिंदे, एसटी प्रवासी संजय तुकाराम शितप (वय ५८, रा. खडीकोळवण), एर्टिका चालक संतोष पवार, शंभुराज शिवाजी पवार (वय १३, रा. रामनगर, सातारा) तसेच श्रीकांत लक्ष्मण मानपुरी (वय २७, रा. भिवंडी, ठाणे) हे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना वाहनातून बाहेर काढून तातडीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करत पंचनामा केला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश सुतार, महिला हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर, कॉन्स्टेबल तानाजी पाटील आणि महिला कॉन्स्टेबल रेश्मा चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.








