रत्नागिरी, दि. ६ (प्रतिनिधी): “राज ठाकरे यांचे भाषण मराठी आत्मीयतेचा संदेश देणारे होते, पण दुसरे भाषण हे फस्ट्रेशनमधून आलेले, स्वार्थासाठी होते,” अशा तीव्र शब्दांत उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
सामंत म्हणाले, “दोन्ही नेत्यांची भाषणं आम्ही ऐकली. एक भाषण मराठी अस्मितेचं होतं, दुसरं मात्र केवळ सत्तेसाठी आणि वैयक्तिक आकसातून होतं. उद्धव ठाकरेंचं संपूर्ण भाषण राजकीय दृष्टिकोनातूनच होतं.”
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना काही राजकीय नीतीमानता पाळली, पण उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य मात्र ‘फस्ट्रेशन’ दाखवणारे होते, अशी घणाघाती टीका सामंत यांनी केली. “राज ठाकरेंच्या भाषणाला मिळालेला प्रतिसाद दुसऱ्या भाषणाला मिळालाच नाही,” असंही ते म्हणाले.
“सावरकरांवर शिव्या देणाऱ्यांसोबत ठाकरे का?”
सावरकरांवर शिवीगाळ करणाऱ्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे अजूनही आहेत, हेच आश्चर्यकारक असल्याचं मत सामंत यांनी व्यक्त केलं. “काँग्रेसने ज्यांना शिव्या घातल्या, त्यांच्याशी तुम्ही अजून का आहात?” असा थेट सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.
“जय गुजराती म्हणणारे आपणच!”
मुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘गुजराती’ शब्दाच्या वापरावरून सुरू असलेल्या वादाबाबत सामंत म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनीही ‘जय गुजराती’ म्हटलं होतं, वरळीमध्ये ‘केम छो’ चे बॅनर आपणच लावले होते. मग आज शिंदेंवर टीका करणं हे फक्त राजकीय दुजाभाव आहे.”
“राज-उद्धव मेळावा म्हणजे युती नाही”
सामंत यांनी स्पष्ट केलं की, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र मेळावा झाला म्हणजे युती झाली असं नाही. राज ठाकरेंनी कुठेही आम्ही एकत्र येणार असल्याचं म्हटलं नाही. सध्या तरी जागावाटप, तिकीट वाटप झालं असल्याचे संकेत नाहीत.”
“हिंदी सक्तीचा आरोप फेक!”
राज्य सरकारवर हिंदी सक्तीचा आरोप करणाऱ्यांवरही सामंतांनी टीका केली. “महायुती सरकारने हिंदी सक्ती केलीच नव्हती, ती ऑप्शनल होती. हे सर्व फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न आहे,” असं ते म्हणाले.
“मुंबई महाराष्ट्रापासून दूर जाऊ देणार नाही!”
“मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केलं आहे की मुंबई महाराष्ट्रापासून दूर जाऊ देणार नाही,” असं म्हणत सामंतांनी विरोधकांना पुन्हा एकदा सुनावलं.
“लिंबू मिरचीवर स्वतंत्र पत्रकार परिषद हवी!”
विरोधकांच्या टीकेला मिश्किल प्रत्युत्तर देताना सामंत म्हणाले, “लिंबू-मिरचीवर इतका गदारोळ होतोय की आता त्यावर स्वतंत्र पत्रकार परिषद घ्यावी लागेल. त्यासाठी २ तास लागतील आणि ३-४ लोकांना बरोबर घ्यावं लागेल!”
“महामार्ग, पुतळे, आणि विकास कामे प्रगतीपथावर”
सामंत म्हणाले, “मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली असून अधिकाऱ्यांनी काम सुरू केलं आहे. पुढच्या पावसाळ्यात खड्ड्यांच्या तक्रारी येणार नाहीत. चिपळूणचा ओव्हरब्रिज मार्चपर्यंत पूर्ण होईल. पाली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जात असून तो फ्लायओव्हरवरून दिसेल अशा पद्धतीने त्याचे काम सुरू आहे.”
“उद्योजकाचे वक्तव्य चुकीचे, त्याला महाराष्ट्रावर बोलण्याचा अधिकार नाही”
एका उद्योजकाच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले, “ते वक्तव्य त्याचं वैयक्तिक मत असू शकतं, पण त्याला महाराष्ट्रावर टीका करण्याचा अधिकार नाही.”