मुंबई, दि. २९ : निवडणूक आयोगाचा कारभार आणि मतदार यादीच्या ‘SIR’ प्रक्रियेवर आक्षेप नोंदवत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत संयुक्त महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे न वापरता सहभागींच्या हातात केवळ तिरंगा असणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली. मोर्चासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे.
राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मंगळवारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी राज ठाकरे यांनी ४ ऑक्टोबरच्या मोर्चाची दिशा आणि रूपरेषा स्पष्ट केली. त्यांच्या माहितीनुसार, सकाळी १० वाजता भायखळ्यातील रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीजवळ कार्यकर्ते आणि नागरिक जमणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास मोर्चाला सुरुवात होईल. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील मुंबई महापालिका मुख्यालयाजवळ पोहोचणार असून, तेथे सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत गेल्या काही वर्षांपासून आपण भूमिका मांडत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. ईव्हीएमच्या मुद्द्यावर २०१७-१८ मध्ये विविध राजकीय नेत्यांशी चर्चा केल्याचेही त्यांनी नमूद केले. निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील विविध प्रश्नांवर आपण यापूर्वीही आवाज उठवला असल्याचे सांगत, या विषयावर अधिक सविस्तर भूमिका ४ ऑक्टोबरच्या मोर्चात मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“चार तारखेला मोर्चात काय बोलायचे आहे, ते आम्ही बोलू,” अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. पत्रकारांनी मोर्चाच्या उद्देशाबाबत आणि पुढील आंदोलनाच्या दिशेबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी त्यावर सविस्तर भाष्य करण्याचे टाळले. मोर्चानंतर पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
सत्ताधारी पक्षालाही निमंत्रण
या मोर्चाला केवळ विरोधी पक्षांचा कार्यक्रम न ठेवता सर्व राजकीय पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. संबंधित नेत्यांना पत्राऐवजी फोनवरून निमंत्रण देण्यात येणार आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनाही सहभागी व्हायचे असल्यास त्यांचे स्वागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसतील. सर्वांच्या हातात तिरंगा असेल. हा विषय लोकशाही आणि संविधानाशी संबंधित आहे,” असे राज ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, विरोधी पक्षांना निवडणुकीतील पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडायचे आहे, असा आरोप भाजपकडून केला जात असल्याबाबत राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, “मराठीत एक म्हण आहे, खाई त्याला खवखवे,” असे म्हणत प्रतिक्रिया दिली.
ठाकरे बंधूंच्या संयुक्त नेतृत्वाखाली होणाऱ्या या महामोर्चामुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजासह ‘SIR’ प्रक्रियेवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चेला मुंबईत नव्याने व्यासपीठ मिळणार आहे. मोर्चाला विविध पक्ष आणि संघटनांकडून किती प्रतिसाद मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








