राजापूर, दि. २० (प्रतिनिधी) : पाचलमधील कै. ज्ञा. म. नारकर वाचनालय पाचल येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. सुरुवातीला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला कार्यवाह विनायक खानविलकर व वाचनालयाचे सभासद, जेष्ठ पत्रकार शरद पळसुलेदेसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
वाचन प्रेरणादिनामित्त वाचनालयामध्ये तीन दिवसांचे पुस्तकांचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन वाचनालयाचे कार्यवाह विनायक खानविलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनाला श्री मनोहर हरि खापणे महाविद्यालयाचे मराठी विषयाचे प्रा. डॉ. विकास पाटील यांनी आवर्जुन भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या प्रदर्शनाला पाचल व परिसरातील अनेक विद्यार्थ्यांनी भेट देऊन ग्रंथप्रदर्शनातील पुस्तके हाताळून वाचनाचा आनंद घेतला. प्रदर्शनामध्ये ऐतिहसिक, चरित्रात्मक, वैचारिक, प्रवासवर्णन, कथा, कविता कादंबरी, बालसाहित्य अशा विविध प्रकारच्या पुस्तकांची मांडणी करण्यात आली होती.
उपस्थितांचे स्वागत ग्रंथपाल विठोबा चव्हाण यांनी केले तर आभार लिपिक अंकिता सुतार यांनी मानले.








