रत्नागिरी, दि. ७ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनींच्या कौशल्य विकासाला चालना देणारा उपक्रम रत्नागिरीत आयोजित करण्यात आला. भाजप महिला मोर्चा दक्षिण रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्ष तसेच रत्नागिरी नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. वर्षाताई ढेकणे यांच्या पुढाकाराने सुमारे ५० हून अधिक विद्यार्थिनींना शैक्षणिक आर्थिक सहाय्य देण्यात आले.
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांचे स्वीय सहाय्यक आणि रत्नागिरीचे सुपुत्र अनिकेतदादा पटवर्धन यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. आयफर (IFER) व डॉ. जे. एस. केळकर मेमोरियल फाउंडेशन यांच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्र व कौशल्य विकासाशी संबंधित विविध अभ्यासक्रम व प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी इच्छुक विद्यार्थिनींना या उपक्रमातून आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले.
या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थिनींना आरोग्य क्षेत्रातील तसेच रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून महिलांचे सशक्तीकरण व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यावेळी आयफरचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. हृषिकेश केळकर, संचालक अनिरुद्ध फळणीकर तसेच गीतांजली लेले यांनी सौ. वर्षाताई ढेकणे यांचे विशेष आभार मानले. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण आणि अनिकेतदादा पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेच्या वतीने सौ. वर्षाताई ढेकणे यांना आभाराचे पत्रही सुपूर्द करण्यात आले.
या कार्यक्रमाला भाजपा रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे, जिल्हा चिटणीस तसेच पदवीधर प्रकोष्ठ संयोजक मनोज पाटणकर, रत्नागिरी नगर परिषदेच्या नगरसेविका मानसीताई करमरकर, महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस नपुराताई मुळ्ये, महिला मोर्चाच्या माजी जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या ताई जठार, महिला मोर्चा शहराध्यक्ष भक्तीताई दळी तसेच भाजप रत्नागिरी शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.
याचवेळी रत्नागिरी महिला मोर्चाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना शहरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या शिक्षण व कौशल्य विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.








