विराट-रोहितचे पुनरागमन; अफगाणिस्तान मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, जडेजाला विश्रांती

मुंबई, दि. १९ : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाची घोषणा केली आहे. गुवाहाटी येथे झालेल्या निवड समितीच्या बैठकीनंतर संघ जाहीर करण्यात आला असून, कसोटी आणि एकदिवसीय या दोन्ही प्रकारांत टीम इंडियाचे नेतृत्व शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे.

या मालिकेतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे एकदिवसीय संघात पुनरागमन. रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांचा संघात समावेश करण्यात आला असला, तरी त्यांचा अंतिम सहभाग तंदुरुस्ती चाचणीवर अवलंबून असणार आहे. दुसरीकडे, कामाचा ताण लक्षात घेता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. तसेच अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजालाही कसोटी संघातून विश्रांती देण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी बुमराह सध्या आगामी इंग्लंड दौऱ्याच्या तयारीत असल्याने त्याच्या वर्कलोडचे व्यवस्थापन करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.

उपकर्णधारपदात बदल

या मालिकेसाठी संघात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ऋषभ पंतला उपकर्णधारपदावरून हटवण्यात आले असून, कसोटी संघात के.एल. राहुलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर एकदिवसीय संघात श्रेयस अय्यर उपकर्णधार म्हणून काम पाहणार आहे.

युवा खेळाडूंना संधी

या मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे या नवोदित खेळाडूंना प्रथमच एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. आयपीएल 2026 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून प्रभावी कामगिरी करणाऱ्या प्रिन्स यादवने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले होते.

याशिवाय यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांसारख्या युवा खेळाडूंवरही संघ व्यवस्थापनाचा विश्वास कायम आहे. अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समतोल साधण्याचा प्रयत्न या निवडीत दिसून येत आहे.

कसोटी संघ

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुथार, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे आणि ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).

एकदिवसीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), के.एल. राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे.

मालिकेचे वेळापत्रक

आयपीएल 2026 नंतर भारतीय संघ अफगाणिस्तान मालिकेसाठी सज्ज होणार आहे. एकमेव कसोटी सामना 6 जूनपासून न्यू चंदीगड येथे खेळवला जाणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका 14 जूनपासून सुरू होईल. पहिला सामना धर्मशाला, दुसरा लखनऊ आणि तिसरा सामना चेन्नई येथे होणार आहे.

आगामी मोठ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही मालिका भारतीय संघासाठी महत्त्वाची मानली जात असून, युवा खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार आहे.

आणखी वाचा