IPL चा सर्वात मोठा ट्रेड डील! – जडेजाची 17 वर्षांनी राजस्थानकडे ‘घरवापसी’, तर संजू सॅमसन आता धोनीच्या चेन्नईत

मुंबई, दि. १६ : इंडियन प्रीमियर लीगच्या 2025 हंगामापूर्वी सुरू असलेल्या ट्रान्सफर विंडोनं फार मोठे बदल पाहायला मिळाले. आयपीएल इतिहासातील सर्वात धक्कादायक आणि भव्य व्यापार मानला जाणारा रवींद्र जडेजा–संजू सॅमसन ट्रेड अखेर अधिकृतरित्या जाहीर झाला आहे. बीसीसीआय आणि आयपीएलच्या अधिकृत वेबसाइटनं सोमवारी रात्री ट्रेड झालेल्या सर्व 10 खेळाडूंची यादी जाहीर केली आणि त्यात सर्वांत मोठा व्यवहार म्हणजे जडेजा- सॅमसनची अदलाबदल ठरली.

जडेजा पुन्हा राजस्थानमध्ये — 17 वर्षांनंतर घरवापसी

भारताचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा, ज्याने 2008 साली पहिल्या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण केलं होतं, तो तब्बल 17 वर्षांनी पुन्हा त्या संघात परतला आहे. 2012 पासून चेन्नई सुपर किंग्जमध्ये असलेल्या जडेजानं मागील 12 हंगामात सीएसकेसाठी धडाकेबाज कामगिरी करत पिवळ्या जर्सीचा अविभाज्य भाग बनला होता.

जडेजाचं सीएसकेसोबतचं करारमूल्य गेल्या हंगामात 18 कोटी रुपये होतं. मात्र ट्रेड डीलनुसार राजस्थान रॉयल्सनं त्याला 14 कोटींना आपल्या संघात घेतलं आहे. त्याचं वेतन कमी झालं असलं तरी जडेजाची अनुभवी ऑलराऊंड क्षमता, क्षेत्ररक्षणातील दर्जा आणि सामन्याचा प्रवाह बदलण्याची ताकद पाहता हा व्यापार राजस्थानसाठी फायदेशीर मानला जात आहे.

संजू सॅमसन आता सीएसकेचा — धोनीच्या वारशाची जबाबदारी?

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार म्हणून अनेक वर्षे आपलं नेतृत्व कौशल्य सिद्ध करणारा संजू सॅमसन अखेर चेन्नई सुपर किंग्जमध्ये दाखल झाला आहे. संजूचं सीएसकेमध्ये जाणं विश्वसनीय फलंदाज आणि भावी नेतृत्व पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. एम.एस. धोनीची कारकीर्द अंतिम टप्प्यात असताना, सॅमसनला ‘भावी कर्णधार’ म्हणूनही पाहिलं जात असल्याच्या चर्चा आहेत.

सीएसकेनं या ट्रेडसाठी संजूसाठी तब्बल 18 कोटी रुपये खर्च केले आहेत. राजस्थान रॉयल्सकडून खेळत असताना संजूनं सातत्यपूर्ण कामगिरी, स्थिर फलंदाजी आणि शांत नेतृत्वाची छाप पाडली आहे.

इतरही मोठे ट्रेड — शमी, सॅम करन, शार्दुल, नितीश राणा संघ बदलला

या हंगामात फक्त दोन प्रमुख स्टार्सच नव्हे, तर एकूण 10 खेळाडूंचे ट्रेड झाले आहेत. यामध्ये काही मोठी नावे आहेत:

मोहम्मद शमी — गुजरात टायटन्सहून लखनऊ सुपर जायंट्सकडे (10 कोटी)

सॅम करन — पंजाबहून राजस्थानकडे (2.4 कोटी)

शार्दुल ठाकूर — केकेआरहून मुंबई इंडियन्सकडे (2 कोटी)

मयंक मार्कंडे — सनरायझर्सहून मुंबईकडे (30 लाख)

अर्जुन तेंडुलकर — मुंबईहून LSG मध्ये (30 लाख)

नितीश राणा — RR वरून दिल्ली कॅपिटल्समध्ये (4.2 कोटी)

रुदरफोर्ड आणि डोनोवन फरेरा हेही अनुक्रमे MI आणि RR मध्ये

या सर्व व्यवहारानंतर संघांची रचना मोठ्या प्रमाणात बदलणार आहे.

IPL 2025 हंगाम अधिक रोमहर्षक — धोनीजवळ आता सॅमसन, तर राजस्थानकडे जडेजा-करन कॉम्बिनेशन

संजू सॅमसनच्या येण्याने सीएसकेचा मधल्या फळीतील बळकटी वाढली आहे. शिवाय विकेटकीपिंगचा पर्यायही मजबूत झाला आहे. भविष्यात नेतृत्वाची धुरा सांभाळण्यासाठी हा व्यापार दीर्घकालीन गुंतवणूक मानली जात आहे.

दुसरीकडे राजस्थानकडे आता जडेजा + सॅम करन ही डावखुरी ऑलराऊंडर जोडी असणार आहे, ज्यामुळे संघाच्या समतोलात मोठी वाढ होईल. 2025 हंगामात राजस्थान रॉयल्स सर्वात संतुलित संघांपैकी एक म्हणून उभा राहण्याची चिन्हे आहेत.

आयपीएलचा इतिहास बदलेल असा ट्रेड!

IPL मधील मागील अनेक वर्षांतील मोठ्या ट्रान्सफरमध्ये बेन स्टोक्स, पॅट कमिन्स, सॅम करन, रोहित शर्मा यांसारखे व्यवहार झाले होते. परंतु एका संघाचा कर्णधार आणि दुसऱ्या संघाचा आयकॉन ऑलराऊंडर यांची थेट अदलाबदल — हा IPL इतिहासातील दुर्मिळ आणि सर्वात मोठा ट्रेड मानला जात आहे.

@ChennaiIPL

आणखी वाचा