नवी दिल्ली, दि. १७ : केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) याचे नाव बदलून ‘विकसित भारत – रोजगार आणि उपजीविका अभियान हमी (ग्रामीण) विधेयक’ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयाच्या विरोधात काँग्रेस पक्षाने मुंबईसह देशभरात तीव्र आंदोलन छेडले असून, विविध ठिकाणी नवीन विधेयकाच्या प्रती जाळून निषेध नोंदवण्यात आला.
बुधवारी ऑल इंडिया अनऑर्गनाइज्ड वर्कर्स काँग्रेसच्या बॅनरखाली झालेल्या आंदोलनात काँग्रेस नेते उदित राज यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी नवीन विधेयकाची प्रत जाळत या निर्णयाचा निषेध केला. यावेळी काँग्रेस नेत्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) तीव्र टीका केली.
मुंबईत काँग्रेसचे आंदोलन
मुंबईत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी केंद्र सरकार आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मनरेगाचे नाव बदलण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
काँग्रेसचा भाजपावर गंभीर आरोप
उदित राज यांनी आरोप केला की, ग्रामीण बेरोजगारी दूर करण्यासाठी जगातील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक योजना असलेल्या मनरेगाला संपवण्याचा डाव केंद्र सरकारकडून आखला जात आहे. “मनरेगामधून महात्मा गांधींचे नाव काढणे हा त्यांच्या विचारांवर आणि वारशावर हल्ला आहेच, पण त्याचबरोबर ग्रामीण मजुरांचा रोजगाराचा कायदेशीर हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे,” असे ते म्हणाले.
कर्नाटकातही आंदोलन तीव्र
मनरेगाचे नाव बदलण्याच्या निर्णयाविरोधात कर्नाटकातही काँग्रेसने आंदोलन केले. कर्नाटकचे मंत्री दिनेश गुंडू राव यांनी या निर्णयावर टीका करताना सांगितले की, “हे पाऊल महात्मा गांधींबद्दल भाजप आणि आरएसएसच्या वैचारिक विरोधाचे स्पष्ट प्रतिबिंब आहे.” बेळगावी येथे आयोजित आंदोलनादरम्यान त्यांनी आरएसएस आणि भाजपावर गांधीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केला.
![]()
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आंदोलनात सहभागी
बेळगावी येथील सुवर्ण सौध परिसरात महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ झालेल्या आंदोलनात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनीही सहभाग घेतला. यावेळी केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध करत गांधींच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणावरून केंद्रीय तपास यंत्रणांवरही टीका केली. “नॅशनल हेराल्डचा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीशी घनिष्ठ संबंध आहे. या वृत्तपत्राची स्थापना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली होती,” असे सांगत त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. या प्रकारांमुळे ईडीची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, १७ डिसेंबर २०२५ रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा काँग्रेस पक्षाने यापूर्वीच केली होती. मनरेगाचे नाव बदलण्याचा निर्णय हा गरीब, ग्रामीण मजूर आणि गांधीवादी विचारसरणीविरोधी असल्याचा आरोप करत काँग्रेसने भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे.








