सायबर सुरक्षा आणि महिलांची डिजिटल जबाबदारी

सध्याच्या तंत्रज्ञानप्रधान युगात इंटरनेट आणि डिजिटल माध्यमे ही आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत. शिक्षण, रोजगार, व्यवसाय, संवाद आणि माहितीची देवाणघेवाण या सर्व क्षेत्रांमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. सोशल मीडिया, ऑनलाइन व्यवहार, ई-कॉमर्स, डिजिटल पेमेंट्स यामुळे जीवन अधिक सोयीस्कर झाले असले तरी त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. विशेषतः महिलांशी संबंधित सायबर गुन्हे हा आजच्या समाजासमोरील एक गंभीर प्रश्न बनला आहे. त्यामुळे महिलांनी आणि मुलींनी डिजिटल साक्षरता व सायबर सुरक्षेबाबत जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे.

सायबर गुन्हे म्हणजे इंटरनेट, संगणक किंवा डिजिटल माध्यमांचा वापर करून केले जाणारे बेकायदेशीर कृत्य. या गुन्ह्यांमध्ये ऑनलाइन फसवणूक, आर्थिक व्यवहारांमधील धोके, सोशल मीडियावर होणारा छळ, बदनामी, वैयक्तिक माहितीचा गैरवापर, बनावट खाते तयार करणे, फोटो किंवा व्हिडिओचे मॉर्फिंग करणे, धमकी देणे अशा अनेक प्रकारांचा समावेश होतो. या गुन्ह्यांमुळे केवळ आर्थिक नुकसान होत नाही, तर मानसिक तणाव, सामाजिक प्रतिष्ठेचे नुकसान आणि व्यक्तीच्या सुरक्षिततेवरही परिणाम होऊ शकतो.

आज इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, फेसबुक, टेलिग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. या माध्यमांवर आपले विचार व्यक्त करण्याचे, माहिती शेअर करण्याचे आणि संवाद साधण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. मात्र हे स्वातंत्र्य वापरताना सुरक्षिततेची जाणीव आणि सामाजिक जबाबदारीचे भान असणे तितकेच महत्त्वाचे आहे. कोणतीही माहिती, फोटो किंवा व्हिडिओ सार्वजनिकरित्या शेअर करताना त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे का याचा विचार करणे आवश्यक आहे.

अनेक वेळा असे आढळते की काही व्यक्ती परवानगीशिवाय इतरांचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतात किंवा त्यांचे मॉर्फिंग करून चुकीच्या पद्धतीने प्रसारित करतात. अशा प्रकारचे कृत्य केवळ अनैतिकच नाही तर कायद्याने दंडनीय देखील आहे. एखाद्या व्यक्तीच्या नावाने बनावट (फेक) अकाउंट तयार करणे, त्या अकाउंटद्वारे चुकीची माहिती पसरवणे किंवा त्या व्यक्तीची बदनामी करणे हे देखील गंभीर सायबर गुन्हे आहेत.
ऑनलाइन छळ (Online Harassment) हा सुद्धा सायबर गुन्ह्यांचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. सोशल मीडियावर अपमानास्पद कमेंट्स करणे, धमकी देणारे संदेश पाठवणे, अश्लील किंवा अपमानास्पद मजकूर पाठवणे, एखाद्या व्यक्तीला सतत त्रास देणे अशा अनेक प्रकारांमध्ये ऑनलाइन छळ दिसून येतो. या प्रकारामुळे महिलांवर मानसिक ताण येतो आणि त्यांच्या आत्मविश्वासावरही परिणाम होऊ शकतो.

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन पद्धतीने केले जात आहेत. ऑनलाइन बँकिंग, यूपीआय व्यवहार, डिजिटल वॉलेट्स या सुविधांमुळे व्यवहार सोपे झाले आहेत; परंतु त्याचबरोबर आर्थिक फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. अनेक वेळा फसवणूक करणारे व्यक्ती फोन कॉल, एसएमएस किंवा लिंकच्या माध्यमातून लोकांकडून बँक तपशील, ओटीपी किंवा पासवर्ड मिळवण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा लॉटरी लागल्याचे, बक्षीस मिळाल्याचे किंवा बँकेचे अधिकारी असल्याचे सांगून लोकांना फसवले जाते. अशा परिस्थितीत कोणालाही ओटीपी, पासवर्ड किंवा बँक खात्याशी संबंधित माहिती देणे टाळणे अत्यंत आवश्यक आहे.

सायबर सुरक्षेच्या दृष्टीने काही मूलभूत गोष्टींचे पालन करणे प्रत्येकाने गरजेचे आहे. सोशल मीडिया अकाउंटसाठी मजबूत पासवर्ड ठेवणे, दोन स्तरांची सुरक्षा (Two Factor Authentication) वापरणे, अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना काळजी घेणे, संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे, तसेच वैयक्तिक माहिती सार्वजनिकरित्या शेअर न करणे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

याशिवाय आपले फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना देखील सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण काही वेळा या फोटो किंवा व्हिडिओंचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीने प्रसारित केले जाते. त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील गोपनीयता सेटिंग्स (Privacy Settings) योग्य प्रकारे वापरणे गरजेचे आहे. आपल्या पोस्ट्स, फोटो किंवा वैयक्तिक माहिती कोण पाहू शकते यावर नियंत्रण ठेवणेही आवश्यक आहे.

डिजिटल माध्यमांचा वापर करताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आपण केलेली एखादी पोस्ट, कमेंट किंवा फॉरवर्ड केलेला मेसेज कोणाच्या प्रतिष्ठेला धक्का देणारा तर नाही ना याचा विचार करणे आवश्यक आहे. चुकीची माहिती, अफवा किंवा अपमानास्पद मजकूर पुढे पाठवणे टाळले पाहिजे. कारण डिजिटल माध्यमांवर प्रसारित होणारी माहिती अत्यंत वेगाने पसरते आणि त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.
भारतात सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध कायदे अस्तित्वात आहेत. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 (Information Technology Act 2000) तसेच भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत अनेक तरतुदी सायबर गुन्ह्यांवर कारवाई करण्यासाठी लागू होतात. एखाद्या व्यक्तीची बदनामी करणे, अश्लील मजकूर प्रसारित करणे, बनावट ओळख वापरणे, आर्थिक फसवणूक करणे अशा गुन्ह्यांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

जर एखाद्या महिलेला सायबर गुन्ह्याचा सामना करावा लागला तर तिने त्वरित संबंधित यंत्रणेकडे तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. भारत सरकारच्या सायबर क्राईम पोर्टलवर (www.cybercrime.gov.in) ऑनलाइन तक्रार नोंदवता येते. तसेच सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये त्वरित मदत मिळण्यासाठी 1930 हा राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक देखील उपलब्ध आहे.

महिलांनी सायबर गुन्ह्यांबाबत घाबरून न जाता जागरूक आणि सजग राहणे गरजेचे आहे. डिजिटल माध्यमे ही संधी आणि प्रगतीचे साधन आहेत, परंतु त्यांचा वापर करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. डिजिटल साक्षरता, कायद्याची माहिती आणि सुरक्षिततेचे भान असल्यास सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करणे शक्य आहे.

आजच्या काळात जशी शारीरिक आणि मानसिक हिंसेची चर्चा होते, तशीच डिजिटल हिंसाही एक गंभीर सामाजिक समस्या बनत आहे. त्यामुळे महिलांनी डिजिटल माध्यमांचा वापर करताना स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सजग राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुरक्षित डिजिटल वापर ही केवळ वैयक्तिक जबाबदारी नसून ती सामाजिक जबाबदारीही आहे.

जागरूकता, सावधगिरी आणि कायदेशीर माहिती यांच्या माध्यमातून आपण सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे आणि समाजाचे संरक्षण करू शकतो. डिजिटल माध्यमांचा सकारात्मक आणि सुरक्षित वापर करूनच आपण एक सुरक्षित, सशक्त आणि जागरूक समाज निर्माण करू शकतो.

 

– माधवी जाधव
संरक्षण अधिकारी
महिला व बालविकास विभाग

आणखी वाचा