उन्हाळी सुट्टीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू : एसटी, रेल्वे आरक्षणे ‘फुल्ल’; शहरांकडे परतण्याची लगबग

रत्नागिरी, दि. २४ : जिल्ह्याच्या विविध भागांत उन्हाळी सुट्टीनिमित्त गावाकडे आलेले चाकरमानी आता पुन्हा मुंबई, पुण्यासह अन्य शहरांकडे परतीच्या प्रवासाला लागले आहेत. शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची तयारी, शालेय साहित्य व गणवेश खरेदीसाठी चाकरमान्यांनी शहरांकडे परतण्यास सुरुवात केली आहे. परिणामी एसटी, रेल्वे तसेच खासगी आराम गाड्यांची आरक्षणे सध्या पूर्ण क्षमतेने भरली आहेत.

दहावी-बारावी तसेच इतर शालेय परीक्षा संपल्यानंतर टप्प्याटप्प्याने चाकरमानी गावाकडे दाखल झाले होते. काहीजण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करून, तर काहीजण स्वतःच्या खासगी वाहनांतून गावी आले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांत तालुक्यात चाकरमान्यांची मोठी वर्दळ पाहायला मिळत होती. गावागावांत मुंबई-पुणे नोंदणी क्रमांकाच्या वाहनांची मोठी संख्या दिसून येत होती. अनेकांनी विवाहसोहळे, धार्मिक कार्यक्रम तसेच कौटुंबिक समारंभांच्या निमित्ताने आधीच नियोजन करून गावी हजेरी लावली होती.

मात्र, यंदाच्या वाढत्या उकाड्यामुळे आणि तालुक्यातील तीव्र पाणीटंचाईमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला. मान्सूनपूर्व समाधानकारक पाऊस अद्याप झालेला नसल्याने अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई कायम आहे. किनारी भागात अधूनमधून हलक्या सरी कोसळल्या असल्या तरी त्यामुळे पाणीटंचाईचे संकट दूर झालेले नाही. अनेक ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असून, चाकरमान्यांनाही या परिस्थितीचा सामना करावा लागला.

दरम्यान, शाळा सुरू होण्याची तारीख जवळ आल्याने परतीच्या प्रवासासाठी मोठी गर्दी होत आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून एसटी आगार प्रशासनाने नियमित फेऱ्यांसोबत काही जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. तरीदेखील बहुतांश गाड्यांची आरक्षणे पूर्ण भरली आहेत. रेल्वे गाड्यांनाही मोठी गर्दी असून अनेकांना प्रतीक्षा यादीवर समाधान मानावे लागत आहे.

आरक्षण न मिळालेल्या अनेक चाकरमान्यांनी पुणे मार्गे अथवा रेल्वेने मुंबई गाठण्याचा पर्याय निवडला आहे, तर काहीजण खासगी आराम गाड्यांचा आधार घेत आहेत. मान्सून केव्हाही दाखल होण्याची शक्यता असल्याने पावसापूर्वीच शहरांकडे परतण्याचे नियोजन अनेकांनी केले आहे. त्यामुळे सध्या संगमेश्वर तालुक्यात परतीच्या प्रवासाची लगबग आणि वाहतूक स्थानकांवर चाकरमान्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा