विदर्भात उष्णतेचा रेड अलर्ट; २८ मेनंतर वादळी पावसाची शक्यता, केरळमध्ये मान्सून लांबणीवर

पुणे, दि. २६ : राज्यभरात एकीकडे मान्सूनच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेचा कहर कायम आहे. पुणे हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करत पुढील दोन दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. मात्र २८ मेनंतर विदर्भात वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने तापमानात घट होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची आशा आहे. दरम्यान, केरळमध्ये अपेक्षित असलेले मान्सूनचे आगमन काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत पुढील दोन दिवस तापमान ४५ ते ४७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. नागपूरमध्ये ४६.५ अंश, तर भंडारा आणि गडचिरोली येथे ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अकोला आणि नागपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून उष्णतेची तीव्रता कायम राहणार आहे.

विशेष म्हणजे ब्रह्मपुरी हे शहर देशातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी एक ठरले आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून प्रशासनाने विशेष सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. यवतमाळ, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतही उष्णतेची तीव्रता वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

दुसरीकडे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पावसाचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात उष्ण व दमट हवामानामुळे नागरिकांची अक्षरशः कोंडी झाली आहे. वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाड्याचा त्रास अधिक जाणवत असून दुपारच्या वेळेत बाहेर पडणे कठीण बनले आहे.

मान्सूनच्या प्रगतीबाबत माहिती देताना डॉ. सानप म्हणाले की, मान्सून अंदमान-निकोबारमध्ये दाखल झाला असला तरी केरळमध्ये त्याच्या आगमनास ३ ते ४ दिवसांचा विलंब होऊ शकतो. हवामान अनुकूल राहिल्यास ३० मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही दिवसांत तो महाराष्ट्रात पोहोचेल.

दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे, हलके कपडे वापरावेत आणि लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील या बदलत्या हवामानामुळे पुढील काही दिवस हवामानाचा खेळ कायम राहण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा