रत्नागिरी, दि. ४ : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत गुरुवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीचे उमेदवार अनिकेत सुनील तटकरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. या निर्णयानंतर काही तासांतच शिवसेना (उबाठा) पक्षाने बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी जाहीर केल्याने कोकणातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
माघारीच्या अंतिम दिवशी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. विशेष म्हणजे, यावेळी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे त्यांच्या सोबत उपस्थित होते. त्यामुळे या निर्णयामागील राजकीय समीकरणांबाबत अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
उमेदवारी मागे घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना बाळ माने म्हणाले की, “मतदारांची संख्या आणि राजकीय परिस्थिती पाहता महाविकास आघाडीला विजय मिळवणे कठीण वाटत होते. निवडणुकीत घोडेबाजाराच्या चर्चाही सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर मी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.”
महायुतीचा मोठा राजकीय विजय
बाळ मानेंच्या माघारीमुळे निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार अनिकेत तटकरे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळाच्या जोरावर महायुतीने हा मतदारसंघ राखण्यात यश मिळवले आहे.
या विजयामुळे महायुतीतील समन्वय आणि एकजूट अधोरेखित झाली असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील समन्वयामुळेच ही निवड बिनविरोध शक्य झाल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेकडून तातडीची कारवाई
दरम्यान, बाळ मानेंच्या निर्णयानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कठोर भूमिका घेत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. पक्षविरोधी कारवाया आणि अधिकृत उमेदवार असताना विरोधकांशी हातमिळवणी केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली.
शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी समाजमाध्यमांद्वारे या कारवाईची माहिती दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
विशेष म्हणजे, बाळ माने यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत विधान परिषदेची उमेदवारी दिली होती. मात्र ऐन निवडणुकीत उमेदवारी मागे घेतल्याने पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
नितेश राणेंच्या भूमिकेची चर्चा
या संपूर्ण घडामोडीत मंत्री नितेश राणे यांची भूमिका विशेष चर्चेत राहिली. उमेदवारी अर्ज मागे घेताना ते बाळ मानेंसोबत उपस्थित होते. त्यामुळे माने यांच्या निर्णयामागे राणे यांची मध्यस्थी असल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
कोकणातील राजकीय समीकरणांमध्ये भाजपचे वाढते वर्चस्व आणि ठाकरे गटाला धक्का देण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून या घडामोडीकडे पाहिले जात आहे.
भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांनुसार, बाळ माने हे मुंबईहून नितेश राणे यांच्या विमानातून रत्नागिरीत आले होते. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ते पुन्हा राणे यांच्यासोबत मुंबईला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांच्या बैठका सुरू असल्याचे सांगितले जात असून, लवकरच त्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भविष्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने हा प्रवेश महत्त्वाचा ठरू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
भास्कर जाधव यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह
बाळ माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत असलेले ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते भास्करराव जाधव यांच्या भूमिकेबाबतही चर्चा रंगल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ते मुंबईत असल्याची माहिती समोर आल्याने या घडामोडींची त्यांना पूर्वकल्पना होती का, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध : अनिकेत तटकरे
बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर चिपळूण येथे पत्रकारांशी संवाद साधताना अनिकेत तटकरे यांनी बाळ माने यांच्या निर्णयाचे स्वागत केले आणि त्यांचे आभार मानले.
“कोकणच्या विकासाशी संबंधित प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मी प्राधान्याने काम करणार आहे. पायाभूत सुविधा, मत्स्यव्यवसाय, पर्यटन, उद्योग, शिक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ही निवड शक्य झाल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले.
विजय अजितदादांना समर्पित : सुनील तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीचा विजय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्पित केला.
“आज जे काही यश मिळाले आहे, ती अजितदादांची पुण्याई आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने कोकणात अभूतपूर्व यश मिळवले आहे,” असे ते म्हणाले.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, मंत्री उदय सामंत यांच्यासह महायुतीतील सर्व नेत्यांचे त्यांनी आभार मानले.
कोकणातील राजकारणाला नवे वळण
बाळ मानेंच्या माघारीमुळे केवळ विधान परिषद निवडणुकीचे चित्र बदलले नाही, तर कोकणातील राजकीय समीकरणांनाही नवे वळण मिळाले आहे. शिवसेनेकडून झालेली हकालपट्टी, भाजप प्रवेशाच्या चर्चा आणि महायुतीच्या बळकटीमुळे आगामी काळात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोकणातील राजकीय वातावरण सध्या या घडामोडींमुळे चांगलेच तापले असून पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाचे राजकीय निर्णय समोर येण्याची चिन्हे आहेत.








