रत्नागिरी, दि. ४ : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत माघारीच्या अंतिम दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. विशेष म्हणजे, उमेदवारी अर्ज मागे घेताना राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे उपस्थित होते. या घडामोडीमुळे कोकणातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा सुरू आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बाळ माने म्हणाले, “निवडणुकीतील मतदारांची आकडेवारी आणि राजकीय परिस्थिती पाहता महाविकास आघाडीला विजय मिळवणे कठीण दिसत होते. घोडेबाजाराच्या चर्चांमुळे निवडणुकीचे स्वरूप बदलले होते. त्यामुळे मी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.”
माने यांच्या माघारीनंतर निवडणुकीतील स्पर्धा जवळपास संपुष्टात आल्याचे मानले जात असून, महायुतीचे उमेदवार अनिकेत सुनील तटकरे यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पक्षविरोधी कारवायांचा ठपका; हकालपट्टीची घोषणा
दरम्यान, बाळ माने यांच्या या निर्णयानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने त्यांच्यावर तातडीने कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी समाजमाध्यमांद्वारे जाहीर केली.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असताना भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या निर्णयामुळे पक्ष नेतृत्व नाराज झाल्याचे सांगितले जात आहे.
नितेश राणेंच्या भूमिकेची चर्चा
या संपूर्ण राजकीय घडामोडीत मंत्री नितेश राणे यांनी महत्त्वाची मध्यस्थी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. माने यांच्या माघारीनंतर कोकणातील राजकीय समीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली असून, विधान परिषद निवडणुकीत महायुतीने निर्णायक आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
बाळ माने यांच्या माघारीमुळे केवळ निवडणुकीचे चित्रच बदलले नाही, तर महाविकास आघाडीतील अंतर्गत समन्वय आणि पक्षनिष्ठेच्या मुद्द्यावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या निर्णयाचे राजकीय पडसाद आगामी काळात कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि पक्ष संघटनांमध्ये उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








