नवी दिल्ली, दि. ६ : शिक्षण क्षेत्रातील कथित गैरव्यवहारांविरोधात कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) आज दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणार असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे. पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात परतले असून ते स्वतः या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.
सरन्यायाधीशांच्या एका वक्तव्यात बेरोजगार तरुणांची तुलना कॉकरोचशी करण्यात आल्याचा दावा करत त्यावरून सुरू झालेली ही व्यंग्यात्मक चळवळ अल्पावधीतच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. आता ही चळवळ प्रत्यक्ष रस्त्यावर उतरत असल्याने देशभराचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे.
कॉकरोच जनता पार्टीने ‘नीट’ (NEET), ‘सीबीएसई’ (CBSE) आणि ‘सीयूईटी’ (CUET) परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच शिक्षण मंत्रालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे.
गुरुवारी झालेल्या पक्षाच्या पहिल्या पत्रकार परिषदेत प्रवक्ते आशुतोष रांका यांनी शिक्षण मंत्रालयावर अकार्यक्षमतेचा आरोप केला. “गेल्या काही महिन्यांतील घटनांनी शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आणल्या आहेत. देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.
सीबीएसईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरही पक्षाने टीका केली. मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी, “केवळ बदल्या करून प्रश्न सुटणार नाहीत. पेपरफुटी आणि इतर गैरव्यवहारांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर नेमकी काय कारवाई झाली, याची माहिती जनतेला मिळाली पाहिजे,” असे म्हटले.
आंदोलनासाठी अद्याप अधिकृत परवानगी मिळालेली नसल्याची माहिती पक्षाने दिली आहे. तरीही संविधानिक आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे. अभिजित दीपके यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात असताना, पक्षाच्या नेत्यांनी शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.
सीजेपीने सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना कोणतेही पक्षीय झेंडे किंवा बॅनर न घेता आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले असून, हा लढा विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या प्रश्नांसाठी असल्याचा दावा केला आहे. आंदोलनामुळे राजधानीत राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.








