हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत महागोंधळ; सर्व्हर डाऊन, तांत्रिक बिघाडाने विद्यार्थ्यांचा संताप

राज्यभरातील अनेक केंद्रांवर गोंधळाचा आरोप; फेरपरीक्षेच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन, अभिजीत दीपकेंचा पाठिंबा

छत्रपती संभाजीनगर, दि. १६ : मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी घेण्यात आलेल्या टंकलेखन कौशल्य ऑनलाइन परीक्षेत राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. परीक्षा सुरू होताच काही केंद्रांवर सर्व्हर डाऊन, संगणक व कीबोर्डमध्ये बिघाड, लॉगिनची समस्या आणि सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक त्रुटी आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. या प्रकारामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा घेण्याची मागणी करत आंदोलन केले.

छत्रपती संभाजीनगरमधील सुराणा नगर येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होताच सर्व्हरमध्ये अडचण निर्माण झाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला. काही उमेदवारांना लॉगिन करण्यात अडचणी आल्या, तर काहींच्या संगणकावर टंकलेखन करताना कीबोर्ड प्रतिसाद देत नसल्याच्या तक्रारी होत्या. स्क्रीनच्या आकारात आणि प्रदर्शनातही फरक असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

ही टंकलेखन परीक्षा २० गुणांची असून उमेदवारांना मर्यादित वेळेत दिलेला मजकूर टाइप करायचा होता. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला. काही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी गुण मिळाल्याने ते परीक्षेत अपयशी ठरण्याची भीती व्यक्त करत आहेत.

राज्यभरातून तक्रारी

छत्रपती संभाजीनगरबरोबरच कल्याण, ठाणे, नाशिक, नांदेड, गोंदिया, वाशिम आणि भंडारा यांसह अन्य केंद्रांवरही तांत्रिक अडचणी आल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. कल्याणमधील परीक्षा केंद्रावर सर्व्हर ठप्प झाल्याने शेकडो विद्यार्थी अडचणीत आले. पुढील सत्रातील उमेदवारही केंद्रावर पोहोचल्याने गर्दी आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

अभिजीत दीपकेंचा विद्यार्थ्यांना पाठिंबा

छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी भेट घेतली. विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेत त्यांनी फेरपरीक्षेची मागणी केली. “विद्यार्थी फेल झालेले नाहीत, सिस्टिम फेल झाली आहे. अनेक महिन्यांपासून मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना तांत्रिक त्रुटींमुळे नुकसान सहन करावे लागत असेल तर त्याची जबाबदारी प्रशासनाची आहे,” अशी भूमिका दीपके यांनी मांडली.

“जोपर्यंत फेरपरीक्षेबाबत अधिकृत निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांसोबत आंदोलन सुरू ठेवू,” असेही त्यांनी सांगितले. ऑनलाइन परीक्षेवरील विश्वास कमी झाला असून गरज भासल्यास ऑफलाइन परीक्षा घेण्याची मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, काही विद्यार्थ्यांनी पेपर फुटल्याचाही आरोप केला आहे. मात्र, या आरोपाची अधिकृत पुष्टी झालेली नाही. परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित परीक्षा यंत्रणेकडे असल्याचे स्पष्ट केले आहे.

या संपूर्ण प्रकाराबाबत प्रशासनाकडून नेमका काय निर्णय घेतला जातो, फेरपरीक्षा होणार की विद्यार्थ्यांना अतिरिक्त संधी दिली जाणार, याकडे हजारो उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा