प्रज्ञा जांभेकर यांच्या ‘उधार का उजाला’ हिंदी कवितासंग्रहाचे ३० जुलैला प्रकाशन

किशोर कदम, डॉ. किरण कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी) : सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित आणि कवयित्री प्रज्ञा जांभेकर लिखित ‘उधार का उजाला’ या हिंदी कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा गुरुवार, ३० जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये होणार आहे. ही माहिती प्रकाशक तथा मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि साहित्यिक विनय हर्डीकर असतील. तर ज्येष्ठ कवी व अभिनेते किशोर कदम आणि महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

प्रकाशन सोहळ्यानिमित्त काव्यरसिकांसाठी विशेष काव्य अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुनील कांबळे, राजेश शिरभाते आणि सानिका गोडसे हे कवितासंग्रहातील निवडक कवितांचे अभिवाचन करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र हुंजे करणार आहेत.

संवेदनशील भावविश्व उलगडणाऱ्या ‘उधार का उजाला’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमी आणि काव्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सदामंगल पब्लिकेशनतर्फे करण्यात आले आहे.

आणखी वाचा