173 खेळाडू रिटेन तर 71 खेळाडूंवर लागणार बोली; IPL 2026 चं ऑक्शन अबुधाबीमध्ये 16 डिसेंबरला

मुंबई, दि. १६ : इंडियन प्रीमियर लीग 2026 हंगामासाठी खेळाडू रिटेन करण्याची अंतिम मुदत शनिवारी (15 नोव्हेंबर) संपली असून, सर्व दहा फ्रँचायझींनी त्यांच्या अधिकृत रिटेन यादी जाहीर केल्या आहेत. या रिटेन प्रक्रियेत एकूण 173 खेळाडूंना संघांनी कायम ठेवले असून, त्यासाठी तब्बल 1012.45 कोटी रुपये खर्च झाले आहेत. यातील 49 खेळाडू परदेशी असून, एकूण 71 खेळाडूंना विविध संघांनी रिलीज केल्याचं समोर आलं आहे. आता या खेळाडूंवर मिनी ऑक्शनमध्ये बोली लावली जाणार आहे.

यंदा सर्वाधिक खेळाडू रिटेन करणारा संघ म्हणून पंजाब किंग्ज आघाडीवर आहे. पंजाबने तब्बल 21 खेळाडूंना कायम ठेवलं आहे. तर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांनी 20-20 खेळाडू रिटेन केले आहेत. नियमांनुसार प्रत्येक संघाच्या स्क्वॉडमध्ये कमाल 25 खेळाडू असू शकतात आणि त्यापैकी आठपर्यंत परदेशी खेळाडू ठेवण्याची अनुमती आहे.

या वर्षीच्या मिनी लिलावात सर्वात जास्त रक्कम शिल्लक असलेला संघ म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स. केकेआरकडे तब्बल 64.30 कोटी रुपये उपलब्ध असून, ते 13 खेळाडू संघात घेऊ शकतात. त्यापैकी सहा जागा परदेशी खेळाडूंसाठी खुल्या राहतील. चेन्नई सुपर किंग्जकडे 43.40 कोटींसह दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक रक्कम उपलब्ध आहे, तर मुंबई इंडियन्ससाठी केवळ 2.75 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे काही संघांना मोठी खरेदी करता येणार असली तरी काही संघांसाठी रणनीती आखणे अधिक महत्त्वाचं ठरणार आहे.

आयपीएल 2026 चा खेळाडू लिलाव 16 डिसेंबर 2025 रोजी अबुधाबीतील एतिहाद अरेना येथे होणार आहे. आगामी हंगामासाठी 237.55 कोटी रुपये खर्चासाठी उपलब्ध असून, एकूण 77 जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी 31 जागा परदेशी खेळाडूंसाठी आहेत.

रिटेन यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे यांना कायम ठेवण्यात आलं आहे; तर मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह अशा प्रमुख खेळाडूंवर विश्वास दाखवण्यात आला आहे. गुजरात टायटन्सने शुभमन गिल, राशिद खान, राहुल तेवतिया यांच्यासोबत मोहम्मद सिराजलाही रिटेन केलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सने रिंकू सिंग, सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांसारखे खेळाडू कायम ठेवले आहेत.

सनरायझर्स हैदराबादकडून पॅट कमिन्स, हेनरिक क्लासेन, अभिषेक शर्मा, इशान किशन यांसारख्या खेळाडूंना ठेवण्यात आलं आहे. राजस्थान रॉयल्सने यशस्वी जैस्वाल, रियान पराग, तुषार देशपांडे यांच्यासोबत रवींद्र जडेजा आणि सॅम करन या मोठ्या नावांवरही शिक्कामोर्तब केले आहे. तर आरसीबीने रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली भुवनेश्वर कुमार, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, सुयश शर्मा आदी खेळाडू रिटेन केले.

लखनऊ सुपर जायंट्सकडून निकोलस पूरन, ऋषभ पंत, एडेन मार्कराम, मयंक यादव, मोहम्मद शमी यांना ठेवण्यात आलं आहे.

आता सर्व संघांकडे उपलब्ध रक्कम, शिल्लक जागा आणि संघरचनेनुसार 16 डिसेंबरच्या अबुधाबी ऑक्शनमध्ये रणनीती आखण्याचं मोठं आव्हान असेल. काही मोठी नावं रिलीज झाल्यामुळे हा मिनी ऑक्शनही तितकाच रोमहर्षक होणार असून, कोणत्या संघात कोणता खेळाडू जातो याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागणार आहे.

आणखी वाचा