मैत्री दिन विशेष लेख : “मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा…”

“मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा…” – हे शब्द केवळ कवितेतले एक वाक्य नाहीत, तर ते जीवनाच्या तळाशी भिडणारा अनुभव आहे. वणवा म्हणजे आयुष्याचे धगधगते क्षण. जिथे सगळं काही जळून खाक होण्याची शक्यता असते, तिथं जर कोणी तुमच्यासोबत उभा असतो — तितक्याच शांततेनं, संयमाने, आणि थोडा गारवा घेऊन — तर तोच खरा मित्र असतो. त्याच मैत्रीला समर्पित आजचा हा दिवस.
मैत्रीच्या संबंधाला परिभाषा देणे कठीण आहे. कारण ती संबंधांसारखी नसतेच; ती असते अनुभूती. कधीही मोजता न येणारी, पण नेहमीच आतल्या आत जाणवणारी. एका साध्या हास्यातून ती उगम पावते, पण संकटांमधून तावूनसुलाखून खरी होते. लहानपणी आपण मैत्रीला जेवढा महत्त्व देत होतो, तेवढंच किंबहुना त्याहून अधिक मोठं ती आपल्या आयुष्यात परतपरत सिद्ध करत जाते — फक्त आपण ओळखतो का, एवढंच.
अचानक हरवलेला फोन, रात्रभर चाललेली गप्पांची मैफल, चुकलेली वाट आणि चुकीच्या निर्णयानंतरही न बोलता पाठीशी उभं राहणारा एक चेहरा — हा चेहरा म्हणजे मैत्री. मैत्रीचं सौंदर्य हे तिच्या साद देण्यात नाही, तर साद न देता समजण्यात आहे.
जगणं जसजसं पुढे सरकतं, तसतसं आपल्याभोवतीचं गर्दीतलं शहर अधिक एकटं वाटू लागतं. या एकटेपणातही जर कोणी ‘आहे रे’ म्हणत भेटत असेल, तर तीच खरी साथ आहे. अशी साथ केवळ खांद्याला खांदा लावून चालत नाही, तर आत्म्याला आत्म्याने स्पर्श करते. वेळ, पैसा, स्थिती यापेक्षा कितीतरी वर असतो हा बंध.
असेही क्षण येतात, जेव्हा शब्द कमी पडतात आणि डोळ्यांतून ओघळणारा अश्रूच संवाद बनतो. अश्रूंमागे हास्य ओळखणारा, आणि हास्यामागचं दुखणं जाणणारा जो असतो, तो ‘मित्र’ नसतो तर आयुष्याच्या वणव्यात थांबून राहिलेला गरव्या असतो — शांत, समजूतदार, नि:स्वार्थ.
मैत्री ही फुलासारखी असते, जिची दरवळ एखाद्या आठवणीतूनही जाणवते. कधी जुन्या वहीच्या पानातून, कधी कॉलेजच्या कट्ट्यावरून, कधी वाळलेल्या गुलाबाच्या पाकळीतून — आणि कधी केवळ एका जुजबी संदेशातूनसुद्धा.
मैत्री दिन म्हणजे एकत्र बसून सेल्फी घेण्याचा किंवा चॉकलेट शेअर करण्याचा दिवस नाही — हा दिवस आहे स्वतःला आतून तपासण्याचा. आपल्याला कोणीत
“साथ ही नहीं, प्रेरणा देणारे मित्र म्हणजे आयुष्याचं खरं नेटवर्क!”
री समजतं का? आपण कोणाला समजून घेतो का? आपण कोणाच्या आयुष्यात गरव्यासारखं थंड सावली देतो का?
जेव्हा आयुष्यात एखादा क्षण असा येतो की, सगळं अंधारलेलं असतं, आणि समोर वाट सापडत नाही… तेव्हा एक हाक कानावर येते — “चल, मी आहे की.” त्या हाकेच्या आवाजात जर विश्वास वाटत असेल, तर समजावं — आयुष्यात मैत्री आहे.
अशा या न बोलता जगणाऱ्या, न सांगता समजणाऱ्या, न मोजता सोबत चालणाऱ्या नात्याला आजचा दिवस वाहूया. कारण —
“मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा…”
…आणि अशाच गरव्यासारख्या मैत्रीला आजचं हे विनम्र वंदन.
अंकुश कदम, संपादक – दैनिक भैरव टाइम्स

आणखी वाचा