महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे स्मृती मंधानाचा गौरव; महिला विश्वचषकातील चमकदार खेळासाठी 50 लाखांचं पारितोषिक प्रदान

पुणे, दि. १६ : भारतात पार पडलेल्या आयसीसी महिला विश्वचषक 2025 स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने ऐतिहासिक विजय मिळवत संपूर्ण देशाचं नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केलं. या विजयानंतर देशभरातून भारतीय संघाचं आणि प्रत्येक खेळाडूचं मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात आलं. याच प्रदर्शनाची दखल घेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे (MCA) महाराष्ट्राची कन्या आणि भारतीय संघाची आघाडीची फलंदाज स्मृती मंधाना हिचा रविवारी विशेष सत्कार करण्यात आला. MCA चे अध्यक्ष रोहित पवार यांच्या हस्ते स्मृतीला 50 लाख रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं.

महिला विश्वचषकमध्ये स्मृती मंधानानं दिलेलं योगदान अत्यंत उल्लेखनीय होतं. तिनं संपूर्ण स्पर्धेत 54.25 च्या सरासरीनं एकूण 434 धावा करत भारताच्या विजयी मोहिमेत मोलाची भूमिका बजावली. ती स्पर्धेतील दुसरी सर्वोच्च धावा करणारी खेळाडू ठरली. विशेष म्हणजे, न्यूझीलंडविरुद्धच्या लीग सामन्यात स्मृतीनं खेचलेलं तडाखेबाज शतक भारतीय संघाच्या गतीला निर्णायक वळण देणारं ठरलं. या सामन्यातील तिच्या खेळीमुळे तिला सामनावीराचा पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आला. तिचा धडाकेबाज फॉर्म संपूर्ण स्पर्धेत टिकून राहिला आणि भारताच्या विजयानं तिच्या धावांचा कणा बनला.

सत्कार सोहळ्यात MCA अध्यक्ष रोहित पवार यांनी भारतीय महिला संघाच्या कामगिरीचं कौतुक करत त्यांच्या विजयाला ‘भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय’ असे संबोधले. ते म्हणाले, “भारतीय महिला क्रिकेट संघानं जे ऐतिहासिक यश मिळवलं, ते संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. स्मृती मंधानाचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. तिच्या शांत, संयमी आणि आक्रमक फलंदाजीने भारतीय संघाला आवश्यक त्या क्षणी ऊर्जा दिली. तिचा सन्मान करणे ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी गौरवाची गोष्ट आहे.”

याच वेळी त्यांनी पुरुष आणि महिला क्रिकेटमधील समानतेकडे वाटचाल वेगानं सुरू असल्याचं नमूद करत बीसीसीआयचे विशेष आभार मानले. “क्रिकेटर्सना जागतिक दर्जाच्या सुविधा, प्रशिक्षण आणि संधी उपलब्ध करून देण्यात बीसीसीआय महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. त्यामुळेच आज भारत पुरुष आणि महिला दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये जागतिक पातळीवर प्रभावी शक्ती म्हणून उभा राहिला आहे,” असं ते म्हणाले.

स्मृती मंधानानंही सन्मान स्वीकारताना तिच्या क्रिकेट प्रवासातील महाराष्ट्राच्या भूमिकेचा विशेष उल्लेख केला. ती म्हणाली, “माझी क्रिकेटची सुरुवात महाराष्ट्रातील एज-ग्रुप संघातून झाली. आज ज्या यशाच्या उंचीवर मी आहे, त्यामागे महाराष्ट्रातील प्रशिक्षक, संघसहकारी, संघटनांची साथ आणि माझ्या घरच्यांचा विश्वास आहे. महाराष्ट्राची खेळाडू असल्याचा मला सदैव अभिमान आहे. आज मिळालेला सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी क्षण आहे.”

तिनं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचंही विशेष कौतुक केलं. “MCA महिला क्रिकेटपटूंसाठी उत्कृष्ट काम करत आहे. महाराष्ट्र वुमन्स प्रीमियर लीगची सुरुवात हा महिला क्रिकेटला मिळालेला मोठा आधार आहे. तसेच अलीकडे महाराष्ट्राच्या महिला संघानं जिंकलेली सीनियर वुमन्स टी-20 ट्रॉफीही राज्यातील क्रिकेटच्या उभारीचं प्रतीक आहे,” असं स्मृतीनं सांगितलं.

स्मृतीच्या सत्कार सोहळ्याला MCA चे पदाधिकारी, खेळाडू, प्रशिक्षक आणि अनेक क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. भारतीय महिला संघाच्या विश्वचषक विजयानंतर राज्यात आणि देशभरात क्रिकेटप्रेमींमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे. स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर, रिचा घोष, रेणुका ठाकूर आणि इतर खेळाडूंच्या प्रदर्शनामुळे भारतीय महिला संघानं जागतिक क्रिकेटमध्ये नवा बेंचमार्क निर्माण केल्याची भावना व्यक्त होत आहे.

MCA कडून स्मृतीला देण्यात आलेलं हे पारितोषिक केवळ तिच्या खेळाची दखल नसून महिला क्रिकेटला अधिक बळ देणारं पाऊल असल्याचं मानलं जात आहे. भारतीय महिला क्रिकेट आता अधिक व्यावसायिक, स्पर्धात्मक आणि जागतिक दर्जाचं होत असल्याचंही या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलं.

आणखी वाचा