राष्ट्रीय महामार्गांवर ५७३, अन्य मार्गांवर १२५ ब्लॅक स्पॉट

मुंबई-गोवा महामार्गावर २० अपघातप्रवण ठिकाणे; रायगडमध्ये १७, रत्नागिरीत २ तर सिंधुदुर्गात १

दापोली, दि. १६ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील रस्ते आणि महामार्गांवरील वाहतूक वाढण्याची शक्यता असताना महामार्ग पोलिसांनी राज्यातील अपघातप्रवण ठिकाणे म्हणजेच ब्लॅक स्पॉट निश्चित केले आहेत. राज्यातील राष्ट्रीय महामार्गांवर तब्बल ५७३, तर अन्य मार्गांवर १२५ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर एकूण २० ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यात पळस्पे ते पोलादपूर मार्गावर १७, रत्नागिरी जिल्ह्यात , तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ब्लॅक स्पॉट आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील भोस्ते आणि हातखंबा ही दोन ठिकाणे अपघातप्रवण क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. सिंधुदुर्गातील कणकवली-जाणवली हॉटेल परिसराचा यामध्ये समावेश आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गाचे काम मोठ्या कालावधीपासून सुरू असूनही धोकादायक ठिकाणांची समस्या कायम असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये नाराजी आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होणार असल्याने या ब्लॅक स्पॉटवर तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

रायगड जिल्ह्यात पेण, तरणखोप, रामवाडी, वाशी फाटा, वडखळ, डोलवी-नागोठणे, सुकेळी खिंड, शेठपळस, गोरेगाव-रेपोली, लोणेरे, टेम्पाले, तळेगाव पेट्रोल पंप, माणगाव, कशेणे, महाड परिसर, वीर, पोलादपूर, चोळई, धामणदेवी, लोहारे आणि पार्ले गाव आदी ठिकाणांचा अपघातप्रवण क्षेत्रांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

महामार्ग पोलिस व राज्य पोलिसांच्या वाहतूक विभागाने राज्यातील प्रमुख मार्गांवरील अपघातांची ठिकाणे निश्चित करून या ब्लॅक स्पॉटची यादी तयार केली आहे. या ठिकाणी विशेष लक्ष देऊन वाहतूक सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातूनही आवश्यक सुधारणा करण्याची तयारी सुरू आहे.

राष्ट्रीय महामार्गांवरील ब्लॅक स्पॉटमध्ये अहिल्यानगर ३७, बीड २९, छत्रपती संभाजीनगर २४, धुळे ४४, नाशिक ग्रामीण ५५, रायगड २८, रत्नागिरी ३ आणि सिंधुदुर्ग १ यांसह विविध जिल्ह्यांचा समावेश आहे. एक्स्प्रेस-वेवरही काही अपघातप्रवण ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात लांजा येथे ठाकरे सेनेने स्वातंत्र्य दिनी महामार्गावरच चिखलणी-नांगरणी स्पर्धेचे आयोजन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणे निश्चित झाली असली तरी या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार, असा सवाल वाहनचालक आणि प्रवासी वर्गातून उपस्थित केला जात आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा मोठा ताण येणार असल्याने निश्चित केलेल्या ब्लॅक स्पॉटवर गतिरोधक, दिशादर्शक फलक, प्रकाशयोजना, रस्त्याची दुरुस्ती आणि आवश्यक सुरक्षा उपाय तातडीने करण्याची गरज आहे. केवळ ब्लॅक स्पॉटची यादी तयार न करता त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

आणखी वाचा