आदिशक्ती अभियानात कुवारबाव ग्रामपंचायतीचे यश; तालुकास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक

रत्नागिरी, दि. ३१ (प्रतिनिधी): महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘आदिशक्ती अभियानात’ कुवारबाव ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी करत तालुकास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला आहे. या यशाबद्दल ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महिलांच्या समस्या जाणून घेणे, त्यांना सामाजिक, आर्थिक आणि नेतृत्वाच्या दृष्टीने सक्षम करणे तसेच पंचायत राज व्यवस्थेत महिलांचा सक्रिय सहभाग वाढविणे, या उद्देशाने राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत २२ मे ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत आदिशक्ती अभियान राबविण्यात आले होते. या अभियानासाठी राज्य, जिल्हा आणि ग्रामपातळीवर एकूण १३ निकष निश्चित करण्यात आले होते. त्या आधारे विविध उपक्रमांची अंमलबजावणी करून स्पर्धा घेण्यात आली.

ग्रामीण आणि कष्टकरी जनतेचे प्रमाण अधिक असलेल्या ग्रामपंचायतींसाठी या अभियानातील सर्व निकष प्रभावीपणे पूर्ण करणे हे मोठे आव्हान होते. मात्र, कुवारबाव ग्रामपंचायतीच्या आदिशक्ती अभियानाच्या अध्यक्षा सौ. स्नेहल वैशंपायन यांनी सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले. त्याचा परिणाम म्हणून कुवारबाव ग्रामपंचायतीने तालुकास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.

या अभियानात अध्यक्षा सौ. स्नेहल वैशंपायन, सचिव सौ. विभावरी कोळेकर, सदस्य प्रकाश शिंदे, अविनाश खडपकर, मधु शिवलकर, स्वाती लांजेकर तसेच पोलिस पाटील सौ. वीणा पटवर्धन यांनी सक्रिय सहभाग घेतला. प्रशासिका सौ. समीक्षा तळेकर आणि ग्रामविस्तार अधिकारी श्री. बुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.

या उल्लेखनीय यशामुळे कुवारबाव ग्रामपंचायतीच्या महिला सक्षमीकरणाच्या कार्याची दखल घेतली जात असून, ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकारी, सदस्य आणि अभियानात सहभागी झालेल्या सहकाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

आणखी वाचा