मुंबई, दि. १८ : उत्तर भारतातून येणाऱ्या तीव्र थंड वाऱ्यांनी महाराष्ट्रात गारठ्याची लाट पुन्हा अनुभवायला मिळू लागली आहे. राज्यातील तापमानात झपाट्याने घट होत असून नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांसाठी 19 नोव्हेंबर रोजी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबई, पुणे, कोल्हापूरसह राज्यातील बहुतेक शहरांत हिवाळ्याची चाहूल स्पष्ट जाणवत आहे. मुंबईत किमान तापमान 18°C, तर पुण्यात सोमवारी पारा घसरत 9°C वर पोहोचला. कोल्हापूरातही रात्रीचे तापमान 18°C च्या आसपास स्थिर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा सर्वाधिक प्रभाव दिसत असून नाशिकमध्ये सोमवारी तापमान 8°C नोंदले गेले. जळगावातदेखील तापमानात घसरण कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील काही दिवस ही गारठ्याची लाट कायम राहू शकते, असे हवामान विभागाने सूचित केले असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
कोकणात गुलाबी थंडीचा जोर; शेकोट्यांचा आधार, दवाखान्यांत गर्दी वाढली
रत्नागिरी–सिंधुदुर्गासह संपूर्ण कोकणातही गेल्या दोन दिवसांत गारठा लक्षणीय वाढला आहे. आठवडाभरापूर्वी फक्त हलकी थंडी जाणवत असली, तरी आता पहाटेच्या वेळी कडाक्याने थंडी जाणवू लागली आहे. शनिवार–रविवारी तापमानात मोठी घसरण झाल्याने शहरासह ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
अचानक वाढलेल्या थंडीमुळे सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण दवाखान्यांमध्ये वाढताना दिसत आहेत. पहाटे शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह सकाळी कामावर निघणाऱ्या नागरिकांना कुडकुडत घराबाहेर पडावे लागत आहे.
कष्टकरी वर्गाला सर्वाधिक फटका
शहरातील कष्टकरी, हमाल, पेपर वितरक आणि रात्रपाळीतील कामगारांसाठी हा गारठा अधिकच कठीण ठरत आहे. पहाटेच्या वेळी पेपर वाटप करणारे वितरक शेकोटीची उब घेत कामाला सुरुवात करताना दिसत आहेत. बसस्थानक, चौक आणि महामार्गालगत चहा–शेकोटीचा आधार घेत नागरिक थंडीचा सामना करत आहेत.
हिवाळ्याच्या या अचानक वाढलेल्या तीव्रतेमुळे आरोग्यतज्ज्ञांनी उबदार कपडे, गरम पाणी आणि योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिला असून पुढील काही दिवस थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.








