
रत्नागिरी, दि. २३ : दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसी कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी रत्नागिरी शहरात विराट निषेध मोर्चा काढण्यात आला. शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचार मंचाच्या पुढाकाराने आयोजित या मोर्चात हजारो विद्यार्थी, युवक, नागरिक, विविध विद्यार्थी व सामाजिक संघटना, नोकरदार वर्ग तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. “शिक्षण वाचवा, लोकशाही वाचवा”, “हुकूमशाही सरकारचा निषेध असो”, “विद्यार्थ्यांवरील दडपशाही बंद करा”, “सरकार होश में आओ” अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले.

मोर्चाची सुरुवात मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून झाली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाला. हातात फलक, बॅनर आणि घोषणाबाजी करत सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
आंदोलनकर्त्यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांवर रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या पोलिसी कारवाईचा निषेध करत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली. शिक्षण क्षेत्रातील वाढत्या समस्या, विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि रोजगाराच्या संधी याबाबत सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, असेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या सभेत वक्त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे ही लोकशाहीला न शोभणारी बाब असल्याची टीका केली. आंदोलनाशी संबंधित २३ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांबाबत सरकारने उत्तर द्यावे, तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. शिक्षण, रोजगार आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर सरकारने सकारात्मक भूमिका न घेतल्यास राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला.
मोर्चात विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था, युवक, महिला, नोकरदार वर्ग तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. पक्षभेद बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिसी कारवाईचा निषेध नोंदविण्यात आला.







