‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ने रत्नागिरी दुमदुमली!

रस्त्यांवर अवतरला देशभक्तीचा महासागर; सैनिकांच्या सन्मानार्थ ‘सैनिक उद्यान’ आणि ‘सैनिक भवन’ उभारणार : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि. १४ : श्रावणाच्या रिमझिम सरी, हातात डौलाने फडकणारा तिरंगा, आसमंतात घुमणारा ‘भारत माता की जय’चा जयघोष आणि प्रत्येकाच्या हृदयात उचंबळून आलेली राष्ट्रभक्ती… अशा भारावलेल्या वातावरणात ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रत्नागिरी शहराने आज देशभक्तीचा अनोखा जागर अनुभवला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सैनिकांच्या सन्मानार्थ पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीत हजारो रत्नागिरीकर सहभागी झाले. तरुणाईपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून दिव्यांग बांधवांपर्यंत सर्वच स्तरातील नागरिकांनी रॅलीत सहभागी होत राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त केली.

शहरातील मारुती मंदिर चौकातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी पोलीस बँड पथकाने सादर केलेल्या ‘वंदे मातरम्’, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्राच्या राज्यगीतामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी रत्नागिरी शहरातील प्रमुख रस्ते दुमदुमून गेले.

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीत आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि हजारो नागरिक सहभागी झाले.

रॅली शासकीय रुग्णालयाजवळ पोहोचल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर देशभक्तीपर गीतांच्या तालावर आणि तिरंग्याच्या लाटेत रॅली पुढे सरकत जयस्तंभ चौकात पोहोचली. येथे पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या ऐतिहासिक आणि राष्ट्रवादी परंपरेचा गौरव केला. ते म्हणाले, “रत्नागिरीची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आज सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून रत्नागिरीकर ज्या एकजुटीने तिरंग्याखाली उभे आहेत, ते संविधानाचा आदर आणि देशप्रेमाचे ज्वलंत उदाहरण आहे. संविधानाचा आदर कसा करावा, हे संपूर्ण देशाने माझ्या रत्नागिरीकडून शिकावे.”

सैनिकांच्या सन्मानासाठी ‘सैनिक उद्यान’ आणि ‘सैनिक भवन’

देशाच्या सीमेवर खडा पहारा देणाऱ्या सैनिकांप्रती तसेच निवृत्तीनंतर समाजात विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या माजी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना पालकमंत्री डॉ. सामंत यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. पुढील वर्षापासून १५ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत माजी सैनिकांचा विशेष मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

तसेच, पुढील वर्षी १४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या तिरंगा रॅलीपूर्वी रत्नागिरीत दिमाखदार ‘सैनिक उद्यान’ उभारण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. यासोबतच ‘जिल्हा सैनिक भवन’ उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही वास्तू देशातील सैनिक आणि माजी सैनिकांप्रती रत्नागिरीची मानवंदना ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी पुढील वर्षीची तिरंगा रॅली आणखी व्यापक करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. पुढील वर्षी तब्बल एक लाख नागरिकांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

धाडसी युवकांचा विशेष सन्मान

यावेळी संकटसमयी स्वतःचा जीव धोक्यात घालून तन्मय यांचे प्राण वाचविणाऱ्या आयुष कामेरकर, अनुप कामेरकर, सार्थक जठार, भरत जठार आणि आयुष गांधी या साहसी युवकांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांना मानाचा ‘तिरंगा’ देऊन त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यात आले.

विविध शाळांचे विद्यार्थी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि हजारो नागरिकांच्या सहभागामुळे रॅलीला अभूतपूर्व स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे ही रॅली केवळ एक औपचारिक कार्यक्रम न राहता रत्नागिरीकरांच्या मनातील राष्ट्रप्रेम आणि सैनिकांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करणारा ऐतिहासिक सोहळा ठरला.

बँक कर्मचाऱ्यांचीही ‘हर घर तिरंगा’ बाईक रॅली

दरम्यान, ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत अग्रणी जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाच्या वतीने १३ ऑगस्ट रोजी रत्नागिरी शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने देशभक्ती, राष्ट्रीय एकता आणि देशाप्रती समर्पणाचा संदेश तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली.

बँक ऑफ इंडियाच्या आंचलिक कार्यालयापासून बाईक रॅलीला उत्साहात सुरुवात झाली. हातात तिरंगा घेऊन आणि देशभक्तीपर घोषणा देत रॅलीतील सहभागी शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत जयस्तंभ चौकात पोहोचले. तेथे रॅलीचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला.

या बाईक रॅलीत जिल्ह्यातील विविध बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅलीदरम्यान तिरंग्याच्या रंगांनी रत्नागिरी शहरातील प्रमुख रस्ते सजले होते. देशभक्तीपर घोषणांमुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे आणि राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण झाले.

“राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकता आणि देशाप्रती समर्पणाची भावना प्रत्येकाच्या मनात जागृत ठेवणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे,” असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. संपूर्ण उपक्रम अत्यंत शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला.

‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ या अभियानाच्या माध्यमातून रत्नागिरीत विविध उपक्रमांना मिळत असलेला नागरिकांचा प्रतिसाद पाहता, यंदाचा स्वातंत्र्यदिन केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित न राहता तिरंग्याभोवती एकवटलेल्या सामूहिक राष्ट्रभावनेचा उत्सव ठरत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा