रत्नागिरी, दि. २२ (प्रतिनिधी): स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे (पावस, रत्नागिरी) येथील अध्यात्म मंदिरात आयोजित हर्षली अयोध्या नगरी या संगीतमय कार्यक्रमात रामभक्त चिंब भिजले. प्रभू श्रीराम मंदिर स्थापना व राममुर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला स्वामी स्वरूपानंदांच्या मूर्तीला गुहागरमधील कारसेवक अनिरुद्ध भावे यांच्या हस्ते अभिवादन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. या वेळी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्यवाह ऋषिकेश पटवर्धन, विवेक भावे यांच्यासमवेत कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. भावे यांनी राम मंदिराचा इतिहास, मंदिरासाठी झालेला संघर्ष, कारसेवेतील अनुभव कथन अत्यंत ओघवत्या शैलीत सादर केले. त्यांच्या भाषणानंतर सर्वांनी प्रभू श्रीरामाचा जयजयकार केला.
गायक भूषण शितूत, ओंकार बापट, अभिजीत नांदगावकर, करुणा पटवर्धन यांनी सुरेल आवाजात राम गीते सादर केली. त्यांना तबलासाथ सौरभ शिंत्रे, राजू धाक्रस, हार्मोनियम चैतन्य पटवर्धन आणि तालवाद्यसाथ अद्वैत मोरे आणि राघव पटवर्धन यांनी केले. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांनी केले. गायक भूषण शितुत यांनी आरंभी वंदीन, योग ऐसा दिव्य करुणा पटवर्धन यांनी शरयू तीरा वरी, राम जन्माला गं सखी, राम भजन कर मन, विजय पताका आणि राम नाम धरा ही गीते सुरेल आवाजात सादर केली. अभिजित नांदगावकर यांनी राम का गुण गान, नादातुनी या आणि अंजनीच्या सुता, ओंकार बापट यांनी विश्वाचा विश्राम रे हे गीत ऐकवले. हर्षली अयोध्या नगरी, त्रिवार जयजयकार, संहारून अरी या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला रामभक्तांची गर्दी झाली होती.








