जिल्हा बँकेच्या सहकार्याने चणे-शेंगदाणे विक्रेता झाला ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक

चिपळूण शहरातील काविळतळी येथे मी बालपणापासून रहात आहे. मी चौथीत असताना माझी आई नलिनी शंकर सकटे ही धुणी-भांडी करायची. तसेच माझी आजी हौसाबाई सीताराम मोरे ही आंधळी होती. आईने धुणी-भांडी करत आजीचा, माझा व माझा भाऊ नितीन याचा सांभाळ केला. मी शिक्षण घेत असताना आईला मदत म्हणून चिपळूण बसस्थानकात चणे-शेंगदाणे विकत, दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण घेतले. परिस्थितीमुळे पुढे मला शिक्षण घेता आले नाही. त्यानंतर मी रिक्षा चालविण्यास शिकलो, काही दिवसांनंतर रिक्षा धंद्यातून बऱ्यापैकी पैसे मिळू लागले. रिक्षा चालवत असताना चंद्रकांत खंडझोडे यांनी १९९५ साली मला मोठी गाडी शिकवली. सन १९९९ मध्ये माझा विवाह झाला.
चिपळूण येथील व्यावसायिक विवेक भिडे यांच्या गाडीवर काही वर्षे मी चालक म्हणून नोकरी केली, त्यावेळी मला बावीसशे रूपये पगार मिळायचा. एखादी मोठी गाडी घेऊन व्यवसाय करण्याची जिद्द माझ्या मनात निर्माण झाली. चिपळूणमध्ये मला कोणतीही बैंक कर्ज देण्यास तयार नव्हती.
एखाद्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. परंतु त्याच्यामध्ये व्यवसाय करण्याची जिद्द आणि चिकाटी व मेहनत घेण्याची इच्छा शक्ती आहे. अशा होतकरू तरूणाला बँकांकडून कर्ज मिळणे फार दुरापास्त असते. चिपळूण बसस्थानकामध्ये चणे-शेंगदाणे विक्री करणाऱ्या माझ्यासारख्या एका होतकरू तरूणावर रत्नागिरी जिल्हा बँकेचे तालुक्याचे तत्कालीन अधिकारी श्री.ए.वी. चव्हाण साहेब यांनी विश्वास दाखविला. श्री. चव्हाण साहेब यांनी विश्वास ठेवून नवीन आयशर ट्रक खरेदीसाठी सन २००९ मध्ये मला रू.९ लाख कर्ज दिले, त्यामुळे मी १२ लाख किंमतीचा नवीन आयशर ट्रक खरेदी केला. कर्जासाठी जामीन म्हणून तत्कालीन तलाठी श्री. लोध साहेब यांनी आपली १२ गुंठे जागा बँकेच्या कर्जास तारण दिली. सन २००९ मध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज दिल्यामुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मी कर्जाची नियमीत व मुदतीत परतफेड केली. माझे मातीचे व कौलारू पध्दतीचे मोडकळीस आलेले जुने घर असल्यामुळे नवीन घराची आवश्यकता होती. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्लॅबचे घर बांधण्यासाठी मला सन २०११ मध्ये रू. ६ लाख ७८ हजार कर्ज दिले. सदर ट्रक व घरकर्जाचे नियमीत हप्ते भरणा करून दोन्ही कर्जखाती पूर्णफेड केल्यानंतर सन २०१६ मध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने मला नवीन ट्रक खरेदीसाठी रू.१८ लाख ७८ हजार कर्ज दिले. या कर्जाची सुध्दा मी नियमीत परतफेड करून सदरचे कर्ज मुदतीत पूर्णफेड केले. त्यामुळे बँकेने जानेवारी २०२५ मध्ये नवीन आयशर ट्रक खरेदीसाठी रू. २७ लाख ४५ हजार कर्ज दिले आहे. मी रत्नागिरी जिल्हा बँकेचा ऋणी आहे. मी रत्नागिरी जिल्हा बँकेकडून वेळोवेळी घेतलेल्या कर्जाची नियमीत परतफेड केल्यामुळे बँकेने माझ्यावर पूर्ण विश्वास टाकून, मला प्रत्येक वेळी आर्थिक सहाय्य केले आहे. माझ्या व माझ्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नत्तीमध्ये केवळ आणि केवळ रत्नागिरी जिल्हा बँकेचाच सिंहाचा वाटा आहे. यामध्ये माझा भाऊ श्री. नितीन सकटे याचीही मोलाची साथ मला लाभली. त्यामुळेच आम्ही ट्रक व्यवसायात दोघांनी रात्रंदिवस मेहनत करून बँकेच्या कर्जाची नियमीत परतफेड केली.
आज समाजात वावरताना मला जो मान व प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे, ती केवळ माझ्या रत्नागिरी जिल्हा बँकेमुळेच. त्यामुळे मी रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. चोरगे साहेब, उपाध्यक्ष मा. जाधव साहेब, सन्मा. संचालक मंडळ, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण साहेब, अधिकारी व कर्मचारी यांचा ऋणी आहे. जर सन २००९ मध्ये रत्नागिरी जिल्हा बँकेने मला वाहतुक व्यवसाय करण्यासाठी मदत केली नसती, तर आज हे सोन्याचे दिवस माझ्या कुटुंबाला प्राप्त झाले नसते, त्यामुळे जिल्ह्यातील होतकरू व प्रामाणिकपणे मेहनत घेणाऱ्या तरूणांना मी आवाहन करतो की, अशा होतकरू तरूणांनी रत्नागिरी जिल्हा बँकेच्या कर्जयोजनांचा लाभ घेऊन, कर्जाची नियमीत परतफेड करावी व बँकेचा विश्वास संपादन करावा.
– गणेश शंकर सकटे, काविळतळी, कराड रोड, चिपळूण

आणखी वाचा