संगमेश्वर, दि. १ : बोरसूत येथील कथित २५ लाख रुपयांच्या वादग्रस्त रस्ता प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, पाटबंधारे विभागाने कालव्यावर टाकलेला भराव हटवून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत सुरू केला आहे. कालवा बुजवून त्यावर रस्ता तयार करण्यात आल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
उमेश बने आणि शैलेश संसारे यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत गडगडी प्रकल्पाचे उपअभियंता आर. आर. मोहिते आणि कार्यकारी अभियंता पी. डी. जाधव यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या उपस्थितीत कालव्यावरील भराव हटविण्यात आला. कालवा बुजवल्यामुळे अनेक वर्षे पावसाळ्यात पाणी साचून उमेश बने यांच्या घराला भूस्खलनाचा धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
कारवाईदरम्यान काही स्थानिकांनी विरोध केल्याची माहिती असून, पावसाळ्यात पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने पोलिस व महसूल विभागालाही पूर्वकल्पना दिली होती. या कारवाईमुळे परिसरातील पूर व भूस्खलनाचा धोका कमी होईल, असा दावा पाटबंधारे विभागाने केला आहे.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित अनेक मुद्दे अद्याप चौकशीच्या प्रतीक्षेत आहेत. संबंधित रस्त्याच्या रुंदीतील नोंदीतील कथित विसंगती, आवश्यक ग्रामसभा ठराव व दस्तऐवजांचा अभाव, जमीनमालकांची संमती, तसेच मुख्य रस्त्यालगत उभारलेल्या कमानीच्या बांधकामाबाबत परवानगी नसल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
याशिवाय, जनसुविधा निधी व कोयना भूकंप निधीतील एकूण २५ लाख रुपयांचा वापर नियमबाह्य पद्धतीने झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संबंधित कामासाठी पाटबंधारे विभागाची आवश्यक परवानगी न घेताच कालव्यात भराव टाकून रस्ता तयार करण्यात आल्याचाही दावा तक्रारदारांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली असून, तक्रारदार शैलेश संसारे यांनी या प्रकरणात न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
(टीप : वरील आरोप तक्रारदारांकडून करण्यात आले असून, संबंधित व्यक्ती किंवा ग्रामपंचायतीची अधिकृत बाजू उपलब्ध झालेली नाही. ती प्राप्त झाल्यास प्रसिद्ध करण्यात येईल.)








