१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा दुबईत विक्रमी धडाका; १४ षटकारांसह १७१ धावा झळकावत ‘वर्ल्ड रेकॉर्ड’

दुबई, दि. १२ : भारतीय क्रिकेटचा उदयोन्मुख तारा ठरत असलेला १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी अंडर-१९ आशिया कपमध्ये पुन्हा एकदा जगभराच्या चर्चेत आला आहे. यूएईविरुद्धच्या सामन्यात त्यानं चौकार-षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडत १७१ धावा झळकावल्या आणि दुबईच्या मैदानावर नवा इतिहास रचला. त्याची खेळी इतकी प्रभावी होती की सामन्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत तोच एकट्याने यूएईच्या गोलंदाजांवर वर्चस्व ठेवत राहिला.

भारताने प्रथम फलंदाजी निवडताच वैभव आणि कर्णधार आयुष म्हात्रेने जोरदार सुरुवात केली. दुसऱ्या षटकात चौकार मारुन वैभवने खातं उघडलं आणि त्याच क्षणापासून त्याची तुफानी धडाकेबाज खेळी सुरू झाली. म्हात्रे लवकर बाद झाला तरी त्याचा वैभवच्या खेळावर कसलाही परिणाम झाला नाही. उलट, त्यानंतर तो अधिकच आक्रमक बनला. फक्त ३० चेंडूत त्याने अर्धशतक गाठले आणि ५६ चेंडूत शतक पूर्ण करत UAEच्या गोलंदाजांना अक्षरशः नामोहरम केले. त्याच्या शतकात नऊ षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता.

शतकानंतरही वैभवचा तुफानी खेळ सुरूच राहिला. त्यानं ८४ चेंडूत १५० धावा पार केल्या. मैदानातील प्रेक्षकांना त्याचे द्विशतकही पाहायला मिळेल असे वाटत होते; परंतु उद्दीश सुरीच्या गोलंदाजीवर १७१ धावांवर त्याचा दमदार खेळ थांबला. त्याच्या या मॅरेथॉन डावात १४ भव्य षटकार आणि सात चौकार होते. वैभवने फक्त सीमारेषेबाहेर पाठवलेल्या फटक्यांमधूनच तब्बल १२० धावा केल्या. त्याने आरोन जॉर्जसोबत दुसऱ्या विकेटसाठी २०० पेक्षा जास्त धावा जोडत भारताच्या विशाल धावसंख्येचा मजबूत पाया रचला.

या सामन्यात वैभवला दोनदा जीवदान मिळाले. २८ धावांवर आणि नंतर ८५ धावांवर प्रतिस्पर्धी संघाने त्याचे झेल हुकले. या दोन्ही चुका त्यानं आपल्या धडाकेबाज खेळीने पूर्णपणे भांडवलात बदलल्या आणि UAEच्या गोलंदाजांना सतत दबावात ठेवले.

२०२५ हे वर्ष वैभव सूर्यवंशीसाठी स्वप्नवत ठरत आहे. या वर्षी त्यानं आयपीएलमध्ये पहिले शतक ठोकल्यानंतर युवा वनडे, भारत A संघ, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि आता आशिया कपमध्येही दमदार शतक ठोकत विक्रमांची मालिका कायम ठेवली आहे. इतक्या विविध स्पर्धांमध्ये एका वर्षात शतके करणारा युवा खेळाडू म्हणून वैभवचं नाव भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं जात आहे.

वैभवची ही तुफानी खेळी भारताच्या विजयाचा पाया ठरली असून, आगामी सामन्यांमध्ये त्याची कामगिरी कशी असणार याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा