रत्नागिरी, दि. ०२ (प्रतिनिधी) : येथील दैवज्ञ पतसंस्थेच्या २०२४ या वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण संस्थेचे ज्येष्ठ सदस्य अनिलाराव उपळेकर, सुवर्ण उद्योगपती आनंदराव वीरकर, अध्यक्ष विजयराव पेडणेकर,सौ. अंजली पेडणेकर, उद्योगपती राजनराव कारेकर, उद्योगश्री महेशरव खेडेकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
दैवज्ञ पतसंस्था मागील सतत २१ वर्ष लेखापरिक्षणात अ वर्गात कामकाज करत आहे. त्यामुळेच ग्राहकांचा विश्वास संपादन करून अतिशय उत्तम सेवा देत आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या २२ व्या आनंदोत्सव ठेव योजनेला ठेवीदारांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. या योजनेत सुमारे १.५० कोटी रुपयांच्या ठेवी ग्राहकांनी ठेवल्या असून एक प्रकारे संस्थेवर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. संस्थेमार्फत सोनेतारण कर्ज व्यवहार फार मोठ्या प्रमाणात केले जात असून जास्तीत जास्त चोख सोन्याचे व्हॅल्यूएशन करून रुपये ५०हजार दहा ग्रॅमप्रमाणे कर्ज वितरीत केले जाते. सोनेकर्जासाठी ग्राहकांचा उदंड प्रतिसादही लाभत आहे. वर्ष अखेरपर्यंत संस्था ०% एन.पी.ए. आणेल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष विजय पेडणेकर यांनी या निमित्त व्यक्त केला आहे.








