रत्नागिरी, दि. ०२ (प्रतिनिधी) : रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात भाजपाने विशेष लक्ष देण्यास सुरवात केली आहे. या मतदारसंघाच्या विकासाकरिता भाजपा सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला सुरवात होणार आहे, अशी माहिती भाजपाचे रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख आणि माजी आमदार बाळासाहेब माने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत जवळपास तीन कोटी, २५१५-१२१८ योजनेअंतर्गत दोन कोटी, सार्वजनिक बांधकाम खात्याचा ३३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतल्याचे माने म्हणाले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे मार्गदर्शन आणि राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गेल्या वीस वर्षांत विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठांना स्थानिक नेत्यांना बळ देण्यास सुरवात केली आहे. महाविजय २०२४ अंतर्गत दक्षिण रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष दादा दळी व विवेक सुर्वे यांना सोबत विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळासाहेब माने तालुक्यात सर्वत्र फिरत आहेत. अनेक गावांमध्ये योग्य रस्ते नाहीत, रस्त्यात खड्डे भरपूर पडलेले आहेत. अनेक वर्षांत या रस्त्यांनी डांबर पाहिलेले नाही, काही वेळा तात्पुरती व निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याच्या समस्या लोक घेऊन येत आहेत. आता भाजपाच्या माध्यमातून रत्नागिरीत विकासकामांसाठी भरीव निधी देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जबाबदारी घेतली आहे. त्या माध्यमातून बाळ माने यांनी हा विकासनिधी आणला आहे. सुमारे ३८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. लवकरच आणखी कोट्यवधींचा निधी मंजूर होणार आहे.
सहकार व इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजनेअंतर्गत निधी मंजूर केला आहे. रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघात दाभीळ आंबेरे, डोर्ले, मावळंगे, निवेंडी, टेभ्ये, चिंद्रवली, माभळे, पावस, कोळिसरे येथील धनगरवाड्यांतील रस्ते, संरक्षक भिंती यासाठी तीन कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रस्त्यांच्या दुरुस्ती, नवीन रस्ते, खडीकरण, डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण यासाठी जवळपास ३३ कोटी रुपये मंजूर केले आहेत, असे बाळ माने यांनी पत्रकारांना सांगितले. मिऱ्या, फणसवळे, तरवळ, कुवारबाव, मिरजोळे, उक्षी, पोमेंडी बुद्रुक, गावडेआंबेरे, राई, भातगाव, हरचेरी, देवधे पोचरी, परचुरी, कुरधुंडा, कोळंबे, खेरशेत कोकरे, माखजन, आरवली, डिंगणी, आंबेड, मानसकोंड या गावांमध्ये विकासकामांसाठी निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे भाजपाच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये कायापालट होईल, असा दावा बाळ माने यांनी केला.








