भारताने 8 वेळा ‘आशिया’ जिंकली

नवी दिल्ली, दि. १७ (वृत्तसंस्था): अखेर आशिया चषक २०२३ची सांगता झाली. १९ दिवस चाललेल्या या स्पर्धेत १३ सामने खेळले गेले. भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेचा डाव ५० धावांवर आटोपला. भारताने ६.१ षटकात १० विकेट्स राखून सामना जिंकला.
आशियाई क्रिकेटमधील सर्वात मानाची क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (१७ सप्टेंबर) खेळला गेला. भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव केवळ ५० धावांवर संपवला होता. या धावांचा पाठलाग करताना भारताने एकही गडी न गमावता दहा गडी राखून विजय मिळवला. यासह भारताने आठव्यांदा आशिया चषक आपल्या नावे केला. भारताने सात वेळा तर श्रीलंकेने सहा वेळा हे विजेतेपद पटकावले होते. गेल्या वेळी भारताने २०१८ मध्ये आशिया चषक जिंकला होता आणि आता पाच वर्षांनंतर आठव्यांदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आशिया चषकावर नाव कोरले आहे.
श्रीलंकेचा लाजिरवाणा पराभव :
श्रीलंका संघाचा कर्णधार दसून शनाका याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी उलटून लावला. श्रीलंका संघ अवघ्या 15.2 षटकात फक्त 50 धावांवर सर्वबाद झाला. श्रीलंकेकडून फक्त कुसल मेंडिस याने सर्वाधिक 17 धावा केल्या. हेमंथाने नाबाद 13 धावा केल्या. श्रीलंकेचे पाच फलंदाज शून्यावर बाद झाले. मेंडिस आणि हेमंथा या दोघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या करता आली नाही. कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, दसून शनाका आणि मथीशा पथिराना शून्यावर तंबूत परतले.
भारत आठव्यांदा आशिया चषक विजेता :
भारताने आशिया कप 2023 जिंकून एकूण आठ वेळा या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. भारताने 1984 मध्ये पहिल्यांदा आशिया कप जिंकला. 1984 मध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव केला होता. त्यानंतर 1988, 1991, 1995, 2010, 2016, 2018 साली आशिया कप जिंकला. त्यानंतर आता आठव्यांदा टीम इंडियानं आशिया चषक पटकावलं आहे.
अंतिम सामन्यात 6 वेळा श्रीलंकेचा पराभव :
आशिया कप स्पर्धेमध्ये टीम इंडियाने सहा वेळा श्रीलंकेचा अंतिम सामन्यात पराभव केला आहे. 1984 मध्ये श्रीलंकेला हरवून भारताने पहिल्यांदा आशिया कपवर नाव कोरलं. त्यानंतर 1988, 1991, 1995, 2010 आणि 2023 मध्ये आशिया चषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव केला.
श्रीलंकेच्या नावावर लाजीरवाणा विक्रम :
आशिया कपमध्ये सर्वात कमी धावसंख्येचा लाजीरवाणा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. श्रीलंका संघाचा डाव 50 धावांवर आटोपला. याआधी आशिया कपमध्ये सर्वात कमी धावांचा विक्रम बांगलादेशच्या नावावर होता. बांगलादेश संघ 87 धावांवर ऑलआऊट झाला होता.
1999 मधील पराभवाचा वचपा काढला :
अखेर 24 वर्षांनंतर भारताने वचपा काढला आहे. 1999 च्या कोको-कोला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रीलंकेने भारताला अवघ्या 54 धावांवर बाद केलं होतं. 54 धावांवर टीम इंडियाचा संपूर्ण संघ तंबूत परतला होता. आता तब्बल 24 वर्षांनंतर भारताने वचपा काढत श्रीलंकेला 50 धावांवर सर्वबाद केलं
सर्वाधिक चेंडू राखून विजय :
श्रीलंका संघाने 50 धावांचं लक्ष दिलं. प्रत्युत्तरात भारताने 6.1 षटकात 51 धावा करत विजय मिळवला. भारतानं एकदिवसीय सामन्यात सर्वाधित 263 चेंडू राखून विजय मिळवण्याचाही विक्रम केला आहे.

आणखी वाचा